Triple Talaq: सरकारला मुस्लिम महिलांची लग्न वाचवायची आहेत की तोडायची आहेत?- सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 20:07 IST2018-12-27T20:02:41+5:302018-12-27T20:07:03+5:30
तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर सुप्रिया सुळेंचा सवाल

Triple Talaq: सरकारला मुस्लिम महिलांची लग्न वाचवायची आहेत की तोडायची आहेत?- सुप्रिया सुळे
नवी दिल्ली: तिहेरी तलाक विधेयकानं गुन्हेगारीकरणाला प्रोत्साहन मिळेल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली. सरकारला मुस्लिम महिलांची लग्न वाचवयाची आहेत की तोडायची आहेत?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तिहेरी तलाक दिल्यास पतीला थेट तुरुंगात टाकण्यात येईल. अशा परिस्थितीत तलाक देण्यात आलेली महिला काय खाणार, तिचा उदरनिर्वाह कसा चालणार, असे प्रश्न सुळे यांनी विचारले.
लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झालं. सभागृहात उपस्थित असलेल्या २४५ सदस्यांनी विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं. तर ११ सदस्यांनी विरोधात मत नोंदवलं. यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. सरकारनं लोकसभेत विधेयक मंजूर केलं. पण राज्यसभेत सरकारला बहुमत नाही. इतकंच काय सध्या राज्यसभेचं कामकाज चालतही नाही. मग या विधेयकाचं रुपांतर कायद्यात कसं केलं जाणार?, असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला.
तिहेरी तलाकच्या माध्यमातून गुन्हेगारीकरणात वाढ होईल, असा दावादेखील त्यांनी केला. एखाद्या पतीनं त्याच्या पत्नीला तिहेरी तलाक दिल्यास तो गुन्हा ठरणार. त्यामुळे त्याची रवानगी थेट तुरुंगात केली जाणार. यानंतर त्या महिलेचं काय? तुरुंगात असलेला पती महिलेला भरपाई कशी काय देणार? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. पती तुरुंगात गेल्यावर त्या महिलेनं काय करायचं असं म्हणत सुळे यांनी सरकारला मुस्लिम महिलांची लग्न वाचवायची आहेत की मोडायची आहेत?, असा सवाल विचारला.