जवानांवर दगडफेक करत दहशतवादी झाकीर मूसाला पळवलं ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2017 08:00 IST2017-08-12T07:57:40+5:302017-08-12T08:00:25+5:30
हिजबूल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर झाकीर मूसा सुरक्षा जवनांना चकमा देत पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

जवानांवर दगडफेक करत दहशतवादी झाकीर मूसाला पळवलं ?
नवी दिल्ली, दि. 12 - हिजबूल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर झाकीर मूसा सुरक्षा जवनांना चकमा देत पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. सुरक्षा जवनांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी त्राल येथील नुरपूरामधील पैतृक परिसरातील एका घरात झाकीर मूसा लपला असल्याची माहिती मिळाली होती. झाकीर मूसा आपल्या एका सहका-यासोबत लपला असल्याच पक्की माहिती सुरक्षा जवानाकडे होती. मात्र त्याला पकडण्यासाठी जवान पोहोचले तेव्हा त्यांच्यावर तुफान दगडफेक करण्यात आली. दगडफेक करत जवानांना अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. स्थानिक लोक दगडफेक करत झाकीर मूसा आणि त्याच्या सहका-याला पलायन करण्यासाठी मदत करत होते.
झाकीर आणि त्याच्या सहका-याने पळ काढल्यानंतर शेवटी दगडफेक थांबली. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी आपण पळून जाण्यात यशस्वी झालो असल्याचा संदेश दिल्यामुळेच दगडफेक थांबवण्यात आली असावी.
ज्या घरात झाकीर मूसा लपला होता तिथे कोणत्याही प्रकारचा गोळीबार झाला नाही. मात्र सुरक्षा जवानांनी कारवाईसाठीची पुर्ण तयारी केली होती. जर दहशतवादी पलायन करण्याचा प्रयत्न करतील, तर त्यांना वेळीच पकडता यावं यासाठी गावाला चारी बाजूने घेराव घालण्यात आला होता. यामध्ये पीर मोहल्ला, शाह मोहल्ला, डागरपूरा आणि नुरापूरा यांचा समावेश होता. हाती आलेल्या माहितीनुसार, झाकीर मूसा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे, मात्र यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी नुरपूरामधील घेराव कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
सुत्रांनी या माहितीला दुजोरा दिला आहे की, जेव्हा सुरक्षा जवान परिसरात घेराव घालत होते तेव्हा दहशतवादी झाकीर मूसा आपल्या सहाका-यासोबत त्याच घरात लपला होता. मूसाने हिजबूल मुजाहिद्दीनमधून बाहेर पडल्यानंतर अल-कायदाच्या मदतीने अंसार गजवा-उल-हिंद नावाची दहशतवादी संघटना उभी केली आहे.
सुर्यास्तानंतर सुरक्षा जवानांनी ऑपरेशन थांबवलं होतं. शनिवारी सकाळी पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सुरक्षा जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात एकूण तीन दहशतवादी लपले असल्याची शंका होती.