ठळक मुद्देमुलाची शिकवणी घेत असताना विवेचना आणि त्या मुलामध्ये  प्रेमसंबंध निर्माण झाले.विवेचना आणि मुलाला एकत्र भेटताना एका नातेवाईकाने पाहिले  आणि या नात्याचा उलगडा झाला.

ग्वालेर, दि. 14 - आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलाच्या प्रेमात पडलेल्या एका 33 वर्षीय शिक्षिकेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्यप्रदेशच्या दतिया शहरात ही घटना घडली. दैनिक भास्करने हे वृत्त दिले आहे. दतियामध्ये बीएसएनएल ऑफीसजवळच्या पंडो वस्तीत राहणारी विवेचना शर्मा त्याच वस्तीत राहणा-या एका 16 वर्षीय मुलाची शिकवणी घ्यायची. हा मुलगा 9 व्या इयत्तेत आहे. 

मुलाची शिकवणी घेत असताना विवेचना आणि त्या मुलामध्ये  प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. यावर्षी करवा चौथ व्रताच्या दिवशी विवेचना आणि मुलाला एकत्र भेटताना एका नातेवाईकाने पाहिले  आणि या नात्याचा उलगडा झाला. दोघांच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाल्यानंतर विवेचनाने मुलाची शिकवणी बंद केली व संविदा शिक्षक भरतीची तयारी सुरु केली. 

बुधवारी सकाळी विवेचना नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी गेली व आठ वाजता घरी परतल्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. बराचवेळ विवेचना कुठे दिसली नाही म्हणून तिच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली. जेव्हा ते पूजेच्या रुममध्ये गेले. तेव्हा आतून दरवाजा बंद होता. विवेचनाच्या भावाने खिडकीतून पाहिले तेव्हा तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. त्यांनी हातोडयाने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व विवेचनाचा श्वास सुरु आहे का ते तपासले पण विवेचनाचा मृत्यू झाला होता. 

अल्पवयीन प्रियकर व त्याच्या चुलत भावाने आज सकाळी घरी फोन केला होता अशी माहिती विवेचनाच्या भावाने दिली. त्या मुलाने आम्हाला चर्चेसाठी घरी बोलावले होते. आम्ही तिथे जाणार होतो पण त्याआधीच विवेचनाने आत्महत्या केली असे त्याने सांगितले. आत्महत्येच्या घटनेनंतर अल्पवयीन प्रियकर आणि तिच्या चुलत भावाने मोबाईल बंद केला असून दोघे फरार झाले आहेत. 

मागच्या महिन्यात  आग्र्यामध्ये गुरु-शिष्याच्या या पवित्र नात्याला कलंकित करणारी घटना घडली होती. येथील 15 वर्षांच्या एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. ही शिक्षिका आणि तिची बहीण गेल्या 9 महिन्यांपासून आपले लैंगिक शोषण करत होती, असे या विद्यार्थ्याने आपल्या तक्रारीत म्हटले होते.