सोनिया गांधी गंगाराम रुग्णालयात दाखल; 2 जून रोजी झाली होती कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 03:54 PM2022-06-12T15:54:09+5:302022-06-12T15:54:25+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली.
नवी दिल्ली: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रविवारी कोविडच्या त्रासामुळे गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 2 जून रोजी सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली होती. यानंतर त्यांनी स्वतःला विलगीकरणात टाकले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
रणदीप सुरजेवाला यांनी माहिती दिली
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, सोनिया गांधी यांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सर्व हितचिंतकांचे काळजी आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद. तिकडे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोनिया गांधी यांच्या आरोग्याबाबत प्रार्थना केली आहे.
Congress President, Smt. Sonia Gandhi was admitted to Ganga Ram Hospital today owing to Covid related issues. She is stable and will be kept at the hospital for observation.
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) June 12, 2022
We thank all the Congress men & women as also all well wishers for their concern and good wishes.
ED चा सोनिया आणि राहुल यांना समन्स
नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने(ED) सोनिया गांधी यांना 23 जून रोजी समन्स बजावले आहे. यापूर्वी ईडीने 8 जून रोजी समन्स बजावले होते, मात्र कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी ईडीकडे वेळ मागितला होता. आता त्या 23 जूनला ईडीसमोर हजर होणार आहेत.
याच प्रकरणी ईडीने राहुल गांधींना 13 जून रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. राहुल गांधी यापूर्वी 2 जून रोजी एजन्सीद्वारे हजर होणार होते, परंतु राहुल गांधी देशाबाहेर होते. यानंतर एजन्सीने त्यांना 13 जून रोजी मध्य दिल्लीतील मुख्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. राहुल गांधी यांच्या चौकशीपूर्वी सर्व खासदार आणि वरिष्ठ नेत्यांना पक्ष मुख्यालयात पोहोचण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे. 13 जून रोजी हे सर्वजण राहुल गांधींसोबत ईडी कार्यालयाकडे मोर्चा काढणार आहेत.
2012 मध्ये नॅशनल हेराल्ड प्रकरण चर्चेत आले होते
2012 मध्ये नॅशनल हेराल्डचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल करून आरोप केला की, काही काँग्रेस नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड, यंग इंडियन लिमिटेडमार्फत विकत घेतले. दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावर असलेल्या हेराल्ड हाऊसची 2000 कोटी रुपयांची इमारत ताब्यात घेण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप स्वामींनी केला होता. कटाच्या अंतर्गत यंग इंडियन लिमिटेडला TJL च्या मालमत्तेचा अधिकार देण्यात आला आहे.