तिहेरी तलाक नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असंवैधानिक - जमियत उलेमा-ए-हिंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 12:50 PM2017-08-24T12:50:55+5:302017-08-24T12:54:46+5:30

'सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असंवैधानिक असून तो आम्हाला मान्य नाही. दिल्लीमध्ये आमच्या केंद्रीय समितीची बैठक होईल. या बैठकीत आम्ही आमच्या भूमिकेवर चर्चा करुन भविष्यातील वाटचाल ठरवू', असं सिद्दीकुल्लाह चौधरी बोलले आहेत

SC verdict on Triple Talaq is unconstitutional says minister | तिहेरी तलाक नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असंवैधानिक - जमियत उलेमा-ए-हिंद

तिहेरी तलाक नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असंवैधानिक - जमियत उलेमा-ए-हिंद

Next

कोलकाता, दि. 24 - सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकसंबंधी दिलेला निर्णय असंवैधानिक असून सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारला 'मुस्लिम पर्सनल लॉ'मध्ये दखल देण्याचा कोणताचा अधिकार नाही असं वक्तव्य जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष सिद्दीकुल्लाह चौधरी यांनी केलं आहे. सिद्दीकुल्लाह चौधरी हे पश्चिम बंगालचे मंत्रीदेखील आहेत. बुधवारी तिहेरी तलाकवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयान हे असंवैधानिक असल्याचं सांगत सहा महिन्यांची बंदी घातली. सोबतच केंद्र सरकारला सहा महिन्यात कायदा बनवण्याचा आदेश दिला आहे. जोपर्यंत कायदा केला जात नाही तोपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. 

'सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असंवैधानिक असून तो आम्हाला मान्य नाही. दिल्लीमध्ये आमच्या केंद्रीय समितीची बैठक होईल. या बैठकीत आम्ही आमच्या भूमिकेवर चर्चा करुन भविष्यातील वाटचाल ठरवू', असं सिद्दीकुल्लाह चौधरी बोलले आहेत. कोलकातामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. शिक्षण विस्तार आणि ग्रंथालय सेवा मंत्री असलेल्या सिद्दीकुल्लाह चौधरी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी इस्लाम धर्म, धर्मातील परंपरा आणि प्रथांची कोणतीही माहिती नसताना हा निर्णय दिल्याचा आरोप केला आहे. 

'कुराणमध्ये तलाकचा कोणताही उल्लेख नसल्याचा दावा न्यायाधीशांनी केला आहे. मात्र कुराणमध्ये तलाकचा उल्लेख आहे. न्यायाधीशांनी निर्णय देण्याआधी आमच्या धर्मातील काही तज्ञांशी चर्चा करायला हवी होती', असं सिद्दीकुल्लाह चौधरी बोलले आहेत. 'कुराणमध्ये तिहेरी तलाकचा उल्लेख असून, आम्ही त्याचं पालन करणार', असंही  त्यांनी सांगितलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी या कायद्याचा गैरवापर होऊ नये यासाठी आमच्या समाजातील लोकांना शिक्षण देऊ असंही सांगितलं आहे. 'गरज पडल्यास जनजागृती करण्यासाठी कोलकातामध्ये रॅली आयोजित करु', अशी माहिती त्यांनी दिली आहे.

सिद्दीकुल्लाह चौधरी यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करणा-या मुस्लिमांना फटकारलं आहे. 'तसलीमा नसरीन यांच्यासारखे लोक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आपलं मत व्यक्त करत असून, निर्णयाच्या बाजूने बोलत आहे. हे त्यांचं वैयक्तिक मदत असून त्यांना इस्लाम आणि परंपरांची माहिती देणं गरजेचं आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर एका राजकीय पक्षानेही सेलिब्रेशन केल्याचं पहायला मिळालं. हे योग्य नाही', असं सिद्दीकुल्लाह चौधरी बोलले आहेत. 
 

Web Title: SC verdict on Triple Talaq is unconstitutional says minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.