मोदींचा 'तो' दावा सपशेल फोल? 2 हजार रुपयांच्या नोटांबद्दलची धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 09:45 AM2020-01-16T09:45:50+5:302020-01-16T09:47:23+5:30

निश्चिलकरणाचा निर्णय जाहीर करताना मोदींनी केलेले दावे फोल

Rs 2000 notes make 56 percent of all seized fake currency shows NCRB data | मोदींचा 'तो' दावा सपशेल फोल? 2 हजार रुपयांच्या नोटांबद्दलची धक्कादायक माहिती समोर

मोदींचा 'तो' दावा सपशेल फोल? 2 हजार रुपयांच्या नोटांबद्दलची धक्कादायक माहिती समोर

Next

नवी दिल्ली: काळा पैसा, दहशतवादी कारवाया, बोगस नोटा, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निश्चलीकरणाचा निर्णय घेतला. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मोदींनी देशवासीयांशी संवाद साधत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा 'कागज का तुकडा' होत असल्याचं जाहीर केलं. यानंतर संपूर्ण देश रद्द झालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत उभा राहिला. भ्रष्टाचार, काळा पैसा, बोगस नोटा यांच्याविरोधातल्या महायज्ञात सहभागी होण्याची संधी देशवासीयांना मिळाली आहे. त्यामुळे जनतेनं या मोहिमेत सामील व्हावं, असं आवाहन मोदींनी केलं होतं.

निश्चलीकरणामुळे बोगस नोटांना आळा बसून अर्थव्यवस्था मजबूत होईल, असा दावा मोदींनी केला होता. यानंतर सरकारनं ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करुन ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या. या नव्या नोटांची नक्कल करुन बोगस नोटा तयार करणं अतिशय अवघड असल्याचा सरकारचा दावा होता. मात्र नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोनं (एनसीआरबी) दिलेल्या आकडेवारीतून २ हजार रुपयांच्या नोटांची नक्कल करणं अतिशय सोपं असल्याचं दिसून आलं आहे. २०१७ आणि २०१८ मध्ये सापडलेल्या बोगस नोटांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास त्यातल्या तब्बल ५६ टक्के नोटा २ हजाराच्या आहेत.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी मोदींनी निश्चलीकरणाचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर २०१७ मध्ये देशभरातून जप्त करण्यात आलेल्या बोगस नोटांमध्ये २ हजाराच्या नोटांचं प्रमाण ५३.३ टक्के होतं. २०१८ मध्ये हाच आकडा ६१.०१ टक्क्यांवर पोहोचला. निश्चलीकरणानंतर २ हजारसह पाचशेच्या नव्या नोटादेखील चलनात आल्या. या नोटांची नक्कलदेखील होऊ लागल्याचं एनसीआरबीची आकडेवारी सांगते. २०१७ मध्ये देशभरातून जप्त करण्यात आलेल्या बोगस नोटांमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचं प्रमाण १.५७ टक्के इतकं आहे. २०१८ मध्ये हाच आकडा ७.२१ टक्क्यांवर गेला.
 
दोन हजार रुपयांच्या सर्वाधिक बोगस नोटा गुजरातमध्ये सापडल्या आहेत. २०१८ च्या अखेरपर्यंत गुजरातमध्ये २ हजाराच्या ३४,६८० बोगस नोटा आढळून आल्या. देशभरात सापडलेल्या २ हजाराच्या बोगस नोटांचा विचार केल्यास त्यातील तब्बल २६.२८ टक्के नोटा एकट्या गुजरातमध्ये सापडल्या आहेत. यानंतर पश्चिम बंगाल, तमिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो. 
 

Web Title: Rs 2000 notes make 56 percent of all seized fake currency shows NCRB data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.