तरुण मतदारांची भूमिका निर्णायक!; पाच वर्षांत ६७ लाख नव्या मतदारांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 04:47 AM2018-11-20T04:47:34+5:302018-11-20T04:49:45+5:30

राजस्थानात प्रत्यक्ष मतदानाला १९ दिवस शिल्लक राहिले आहेत. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते राबत आहेत. आपापल्या पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचावी यासाठी झटत आहेत.

The role of young voters is crucial! 67 lakh new voters in five years | तरुण मतदारांची भूमिका निर्णायक!; पाच वर्षांत ६७ लाख नव्या मतदारांची नोंद

तरुण मतदारांची भूमिका निर्णायक!; पाच वर्षांत ६७ लाख नव्या मतदारांची नोंद

Next

- सुहास शेलार

जयपूर : राजस्थानात प्रत्यक्ष मतदानाला १९ दिवस शिल्लक राहिले आहेत. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते राबत आहेत. आपापल्या पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचावी यासाठी झटत आहेत. राजस्थानात सुमारे पावणेपाच कोटी मतदार असून, त्यातील १८ ते ४० वयाच्या मतदारांची संख्या ५३ टक्के आहे. राजस्थानात गेल्या पाच वर्षांत ६७ लाख ५३ हजार नवीन मतदारांची नोंद झाली. त्यामुळे या निवडणुकीत तरुण मतदारांची भूमिका निर्णायक राहील. ही मते आपल्याकडे खेचण्यासाठी पक्ष विविध क्लृप्त्या लढवित आहेत.
भाजपाने तरुणांना आकृष्ट करण्याची जबाबदारी भाजयुमोकडे सोपविली आहे. महाविद्यालये व गावागावांत युवा मोर्चा नवमतदारांची संमेलने भरवित आहे. सरकारने राज्यात राबविलेल्या भामाशाह योजना, मुख्यमंत्री जल स्वावलंबन योजना, अन्नपूर्णा योजना, कौशल विकास योजना, ग्रामीण गौरव पथ योजना यांची माहिती संमेलनात देत आहेत. प्रत्येक बुथमधील नऊ तरुण कार्यकर्त्यांची विशेष समिती बनविली आहे. यात बुथ प्रमुख, एक महिला कार्यकर्ता, एक एससी, एक एसटी कार्यकर्ता, सोशल मीडियाप्रमुख, मन की बात प्रमुख, स्वच्छता प्रमुखांचा सामावेश आहे. ही मंडळी गावपातळीवर प्रचार करीत आहेत.
भाजपाचे बडे नेतेही स्थानिक पातळीवर प्रचारावर भर देत आहेत. अजमेर दक्षिण मतदारसंघात महिला व बालकल्याण राज्यमंत्री अनिता भदेल यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क अभियान सुरू आहे. यात सरकारच्या विकासकामांची पत्रके वाटली जात आहेत. पुष्कर मतदारसंघात आ. सुरेश सिंह रावत यांनी ‘कमळ संदेश यात्रा’ काढली. भाजपाच्या तुलनेत काँग्रेस स्थानिक पातळीवर प्रचारात काहीशी मागे आहे. प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी सोशल सेलच्या माध्यमातून प्रचारावर भर दिला असला, तरी विश्लेषकांच्या मते हा प्रचार केवळ शहरांपुरताच आहे. ग्रामीण भागांत घरोघरी भेटी द्याव्या लागणार आहेत.
सन २०११ च्या जनगणनेनुसार राजस्थानातील ७५.१ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागांत राहते. शहरी लोकसंख्या केवळ २४.९ टक्के आहे. त्यात ४४. २ टक्के लोकसंख्या अशिक्षित आहे. त्यामुळे काँग्रेसचे हे ‘सोशल’ अस्त्र ग्रामीण राजस्थानात पोहोचणे अशक्यच आहे.
निवडणुकपूर्व सर्वेक्षणांनी काँग्रेसला बहुमताचा अंदाज वर्तविला असला, तरी गेल्या काही दिवसांत भाजपाने प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसने प्रचार पद्धतीत बदल करण्याची आणि नवी तंत्रे अवलंबिण्याची गरज आहे.

राजेंविरुद्ध मानवेंद्रसिंह
काही मतदारसंघांतील सामने अतिशय रोमहर्षक होणार आहेत. मुख्यमत्री वसुंधरा राजे यांच्या विरोधात काँग्रेसने झालरापाटण मतदारसंघात मानवेंद्र सिंह यांना उभे केले आहे. दुसरीकडे काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा नेता ठरू शकणारे सचिन पायलट यांच्याविरोधात भाजपाने आता अचानक युनूस खान यांना उमेदवारी दिली आहे. मानवेंद्र सिंह हे भाजपाचे माजी खासदार असून, ते भाजपातर्फे विधानसभेवरही निवडून आले होते. त्यांनी भाजपामधून अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपाचे एके काळचे वरिष्ठ नेते व वाजपेयी मंत्रिमंडळातील संरक्षणमंत्री जसवंत सिंह यांचे ते पुत्र आहेत.

Web Title: The role of young voters is crucial! 67 lakh new voters in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.