राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर ठाम, पक्षाला दिली एक महिन्याची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 03:15 PM2019-05-28T15:15:44+5:302019-05-28T15:17:52+5:30

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होत आहे.

Rahul Gandhi firmly decides to quit the post of Congress President, given the party's one-month deadline | राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर ठाम, पक्षाला दिली एक महिन्याची मुदत

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर ठाम, पक्षाला दिली एक महिन्याची मुदत

Next

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिला असून, त्यांची समजूत काढण्यासाठी अनेक नेते प्रयत्नशील आहेत. मात्र राहुल गांधी हे अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम असून, त्यांनी अंतिम निर्णय घेण्यासाठी पक्षाला एक महिन्याची मुदत दिल्याची चर्चा आहे. 

काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर अडलेल्या राहुल गांधी यांची समजूत काढण्यासाठी आज सकाळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी तसेच प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी त्यांची भेट घेतली. तसेच अध्यक्षपदासाठी पक्षाला नवा पर्याय मिळत नसल्याचेही राहुल गांधी यांच्या कानावर घालण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

 तुम्हाला पक्षात योग्य वाटतील तसे फेरबदल करा, तसेच पक्ष हवा तसा चालवा, असे सांगण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी काही प्रमाणात मवाळ भूमिका स्वीकारल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कार्यपद्धतीमधील काही अटींसह राहुल गांधी हे काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहण्यास तयार आहेत, असा दावा सूत्रांनी केला आहे. अहमद पटेल आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत झालेला काही टप्प्यांमधील बैठकीनंतर राहुल गांधी या निर्णयाप्रत पोहोचले आहेत, असा दावा सूत्रांनी केला आहे. 

 मंगळवारी सकाळपासून राहुल गांधीना भेटण्यासाठी प्रियंका गांधी, रणदीप सुरजेवाला, सचिन पायलट हे दाखल झाले होते. दरम्यान, मी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचे मन बनवले आहे.  तुम्ही एक महिन्याची मुदत घ्या, पण माझा पर्याय निवडा, असे राहुल गांधी यांनी आज झालेल्या बैठकीत एका ज्येष्ठ नेत्याला सांगितल्याचे वृत्त आहे. तसेच प्रियंका गांधी यांना या सर्वापासून दूर ठेवा. त्या कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार नाहीत, असेही राहुल गांधी यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, लोकसभेमध्ये मी पक्षाचे नेतृत्व करण्यास तयार आहे. तसेच मी कुठल्याही अन्य भूमिकेमध्येही काम करण्यास तयार आहे. पक्षाला भक्कम करण्यासाठी मी काम करत राहीन. मात्र अध्यक्षपदावर राहणार नाही, असेही राहुल गांधींनी सांगितल्याचे वृत्त आहे. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 52 जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद सोडावे आणि गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे पक्षाची धुरा द्यावी, तसेच स्वत: पक्षाचे काम करत राहावे, अशी राहुल गांधी यांची योजना आहे.  

Web Title: Rahul Gandhi firmly decides to quit the post of Congress President, given the party's one-month deadline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.