देशात असंच चालत आलंय, राहुल गांधींनीही मान्य केला कंगना राणौतचा 'घराणेशाही'चा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 14:57 IST2017-09-12T14:57:09+5:302017-09-12T14:57:09+5:30
गेल्या काही दिवसांपासून देशात 'घराणेशाही' या विषयावर तुफान चर्चा सुरू आहे. बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतनं बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्यावर बोट ठेवून हा मुद्दा नव्यानं चर्चेत आणला होता. आता तर कंगना राणौतचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही मान्य केल्याचे दिसत आहे.

देशात असंच चालत आलंय, राहुल गांधींनीही मान्य केला कंगना राणौतचा 'घराणेशाही'चा आरोप
मुंबई,दि. 12 - गेल्या काही दिवसांपासून देशात 'घराणेशाही' या विषयावर तुफान चर्चा सुरू आहे. बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतनं बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्यावर बोट ठेवून हा मुद्दा नव्यानं चर्चेत आणला होता. घराणेशाहीवरुन तिनं दिग्दर्शक-निर्माता करण जोहरलाही चांगलेच धारेवर धरले होते. बॉलिवूडमधील घराणेशाहीचा झेंडा मिरवणाऱ्यांमध्ये करणचाच पुढाकार असून तो 'मुव्ही माफिया' आहे, अशी खोचक टीका कंगनानं करण जोहरवर केली होती. आता तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यानिमित्तान घराणेशाहीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. राहुल यांनी असे काही विधान केले आहे की ज्यामुळे त्यांनी स्वतःहून कंगना राणौतनं केलेल्या आरोपांना अनुमोदन दिल्याचे दिसत आहे. शिवाय त्यांनी घराणेशाहीची चर्चा थेट परदेशापर्यंत नेली आहे. अमेरिकेतील बर्केल येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी घराणेशाहीवर भाष्य केले. 'देशात असंच चालत आलंय, देश घराणेशाहीमुळेच चालत आला आहे', असं विधान राहुल गांधी यांनी केले आहे. यावरुन राहुल गांधी यांनीही अभिनेत्री कंगना राणौतनं वारंवार केलेला घराणेशाहीचा आरोप मान्य केल्याचे दिसत आहे.
घराणेशाहीवर नेमके काय म्हणाले राहुल गांधी?
घराणेशाहीवरुन राहुल गांधी यांनाही टार्गेट केले जाते. यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, 'घराणेशाहीवरुन केवळ काँग्रेस पक्षावर निशाणा साधू नये, आमच्या देशात अशाच पद्धतीनं काम चालत आहेल आहे. अखिलेश यादव, एम.के.स्टॅलिन, एवढंच नाही तर राहुल यांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीचं उदाहरण देण्यासाठी अभिषेक बच्चनच्याही नावाचा उल्लेख केला. त्यामुळे घराणेशाहीसंदर्भात मी काहीही करु शकत नाही, असेही पुढे ते म्हणालेत. आता तर मुकेश अंबानी यांच्यानंतर इन्फोसिसमध्येही घराणेशाही दिसून येत असल्याचं त्यांनी विधान केले.
BJPची लोकं माझ्याविरोधात अजेंडा चालवत आहेत - राहुल गांधी
राहुल गांधी यांनी यावेळी असेही म्हटले की, भाजपामधील काही जण केवळ कम्प्युटरसमोर बसून माझ्याविरोधात अजेंडा चालवत आहेत. मी मूर्ख आहे, मी असा आहे, मी तसा आहे, अशा पद्धतीनं माझ्याविरोधी ते अजेंडा राबवत आहेत. आता देशात काही मंत्र्यांमध्ये बोलणी होऊन कायदे बनवले जात आहेत, मात्र जर काँग्रेसची सत्ता आली तर जनतेशी संवाद साधून आम्ही कायदे बनवू. आता देशाची संसद नाही तर केवळ पीएमओ मजबूत आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
नरेंद्र मोदी माझ्यापेक्षाही उत्तम वक्ते
दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यापेक्षा उत्तम वक्ते आहेत, अशी कबुलीही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली. मात्र स्तुती करण्याच्या बहाण्याने त्यांनी मोदींवर टीका करण्याची संधीही सोडली नाही. 'पंतप्रधान मोदींकडे काही कौशल्यं आहेत. नरेंद्र मोदी माझ्यापेक्षाही उत्तम वक्ते आहेत', असं राहुल गांधी सुरुवातीला म्हटले. नंतर 'गर्दीतील तीन ते चार वेगवेगळ्या गटांपर्यंत आपला संदेश कसा पोहोचवायचा हे मोदींना चांगलंच माहिती आहे. आपला संदेश पोहोचवण्याची त्यांची क्षमता प्रभावी आहे', असंही राहुल गांधी म्हणालेत.