आता पुलवामातील शहिदाच्या वीरपत्नीनेच मागितले 'एअर स्ट्राईक'चे पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 01:03 PM2019-03-06T13:03:22+5:302019-03-06T13:17:40+5:30

पुलवामात शहीद झालेले जवान राम वकील यांच्या पत्नी गीता देवी यांनी सरकारकडे 'एअर स्ट्राईक'चे पुरावे मागितले आहे.

pulwama attack another crpf martyrs wife asks for proof rises question on airstrike | आता पुलवामातील शहिदाच्या वीरपत्नीनेच मागितले 'एअर स्ट्राईक'चे पुरावे

आता पुलवामातील शहिदाच्या वीरपत्नीनेच मागितले 'एअर स्ट्राईक'चे पुरावे

Next
ठळक मुद्देपुलवामातील शहिदाच्या वीरपत्नीनेच 'एअर स्ट्राईक'चे पुरावे मागितले आहेत. पुलवामात शहीद झालेले जवान राम वकील यांच्या पत्नी गीता देवी यांनी सरकारकडे 'एअर स्ट्राईक'चे पुरावे मागितले आहे. गीता देवींच्या आधी शामलीच्या प्रदीप कुमार यांच्या पत्नीने एअर स्ट्राईकचे पुरावे मागितले होते. 

आग्रा - पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याची माहिती केंद्राने द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आता पुलवामातील शहिदाच्या वीरपत्नीनेच 'एअर स्ट्राईक'चे पुरावे मागितले आहेत. 

पुलवामात शहीद झालेले जवान राम वकील यांच्या पत्नी गीता देवी यांनी सरकारकडे 'एअर स्ट्राईक'चे पुरावे मागितले आहे. 'माझ्या पतीचे शव मी पाहिले आहे. जर खरोखरच भारताने जैशच्या कॅम्पवर एअर स्ट्राईक केला असेल तर त्याचे पुरावे सरकार का सादर करत नाही?' असा प्रश्न गीता देवी यांनी सरकारला विचारला आहे. शहीद राम वकिल यांना तीन मुलं आहेत. या तिघांचीही जबाबदारी आता गीता देवींवर आहे. गीता देवींच्या आधी शामलीच्या प्रदीप कुमार यांच्या पत्नीने एअर स्ट्राईकचे पुरावे मागितले होते. 

14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या मंगळवारी भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

अमेरिकेप्रमाणे एअर स्ट्राइकचे पुरावे जगासमोर ठेवायला हवेत -  दिग्विजय सिंह 

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या महिन्यात भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. ज्या प्रकारे अमेरिकेने ओसामा बिन लादेनवर केलेल्या कारवाईचे सबळ पुरावे जगासमोर ठेवले होते. त्याचप्रमाणे आपणही दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईबाबत करायला हवे, असे दिग्विजय सिंह यांनी याआधी म्हटले आहे. दिग्विजय सिंह म्हणाले, 'भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या कारवाईवर मी प्रश्न उपस्थित करत नाही. मात्र, या भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईचे सॅटेलाईटच्या माध्यमातून फोटो मिळणे शक्य आहे. ज्याप्रकारे अमेरिकेने ओसामा कारवाईचे सबळ पुरावे जगासमोर ठेवले. तसेच, सरकारनेही आपल्या भारतीय हवाई दलाने केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या बाबतीत करायला हवे.' एअर स्ट्राईकवर पुरावे मागून काँग्रेस सुरक्षा दलांचे खच्चीकरण करतेय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 



 

Web Title: pulwama attack another crpf martyrs wife asks for proof rises question on airstrike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.