निवडणूक रोखे रद्द केल्याने देश पुन्हा काळ्या पैशांकडे ढकलला गेलाय... 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 07:14 AM2024-04-16T07:14:10+5:302024-04-16T07:14:32+5:30

आता प्रत्येकाला त्याचा पश्चात्ताप हाेईल : पंतप्रधान मोदी 

prime minister narendra modi said, Abolition of electoral bonds has pushed the country back to black money | निवडणूक रोखे रद्द केल्याने देश पुन्हा काळ्या पैशांकडे ढकलला गेलाय... 

निवडणूक रोखे रद्द केल्याने देश पुन्हा काळ्या पैशांकडे ढकलला गेलाय... 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : निवडणूक रोखे योजना रद्द झाल्यामुळे देश पुन्हा काळ्या पैशाकडे ढकलला गेला आहे. प्रामाणिकपणे विचार केल्यास त्याचा प्रत्येकाला पश्चात्ताप होईल, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सोमवारी एका मुलाखतीत सांगितले. गुन्हेगारी कारवायांतील  काळा पैसा तसेच अन्य स्रोतांतून आलेली बेहिशेबी रक्कम निवडणुका लढविण्यासाठी वापरली जात होती. ते रोखण्यासाठी निवडणूक रोख्यांची योजना सरकारने लागू केली होती. अर्थात ही योजना उत्तम पर्याय होता, असे आम्ही कधीही म्हटले नाही. मात्र, विरोधकांनी त्याबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरविली, असे मोदी म्हणाले.

‘स्वदेशात उत्पादनावर  भर’ 
इलॉन मस्क यांच्याकडून भारतात गुंतवणूक होण्याच्या शक्यतेबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी सर्व गुंतवणूकदारांचे स्वागत करतो. पण, स्वदेशात उत्पादने तयार करण्यावर आम्ही अधिक भर दिला आहे.

...म्हणून आम्ही ही योजना आणली होती
- निवडणुकांमध्ये काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत अनेक वर्षे देशात चर्चा सुरू होत्या. निवडणुकांसाठी खूप पैसा खर्च केला जातो. तशी कृती माझ्या पक्षासह इतर पक्षांनीही केली आहे. 
- मात्र, निवडणुकांची काळ्या पैशापासून कशी मुक्तता करता येईल, असा माझ्या मनात विचार होता. लोकांनी दिलेल्या देणग्यांच्या व्यवहारांत आम्हाला पारदर्शकता आणायची होती. त्यासाठी एक प्रयत्न म्हणून आमच्या सरकारने  रोख्यांची योजना राबविली होती.

विरोधी पक्षांनाही देणगी मिळाली 
मनी लाँडरिंगची प्रकरणे दाखल झाल्यानंतर १६ कंपन्यांनी निवडणूक रोख्यांची खरेदी केली. त्यातील ६३ टक्के रक्कम ही अन्य पक्षांना मिळाली. विरोधी पक्षांना देणग्या मिळाव्या म्हणून भाजप प्रयत्न करेल का? असा सवालही मोदी यांनी विचारला. 

नेत्यांविरोधात केवळ ३% ईडी प्रकरणे
ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांपैकी फक्त तीन टक्के प्रकरणे राजकीय नेत्यांविरोधात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांना भीती वाटते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच त्यांच्या आप पक्षाचे नेते मनीष सिसोदिया, भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांना मद्य धोरण प्रकरणात झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी हे विधान केले.

Web Title: prime minister narendra modi said, Abolition of electoral bonds has pushed the country back to black money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.