‘पद्मावती’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 04:09 PM2017-11-19T16:09:55+5:302017-11-19T20:27:59+5:30

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी पद्मावती या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.  एक डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता.

Postponed the date of 'Padmavati' exposition | ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

‘पद्मावती’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

googlenewsNext

नवी दिल्ली - राणी पद्मावती आणि राजपुतांच्या इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप झाल्यामुळे वादात सापडलेल्या पद्मावती चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला पद्मावती चित्रपट येत्या 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता ही तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.  चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. सीबीएफसीकडून अद्याप पद्मावती चित्रपटाला सर्टिफिकेट मिळालेले नाही. त्यातच सर्टिफिकेट नसतानाही या सिनेमाचे मीडिया स्क्रीनिंग केल्यामुळे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 

गेल्या काही दिवसांपासून पद्मावतीला राजपूत संघटनांचा विरोध होत आहे. करणी सेनेने अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि संजय लीला भन्साळी यांना उघडपणे धमकीही दिली. त्यानंतर सेन्सॉर बोर्डानेही तांत्रिक बदलांची कारणे देत चित्रपट निर्मात्यांकडे परत पाठवला. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. 

  सेन्सॉर बोर्डाला चित्रपट दाखवण्याआधी पत्रकारांसाठी 'पद्मावती' चित्रपटाचा विशेष खेळ ठेवण्याचा निर्मात्याचा निर्णय सेन्सॉर बोर्डाला अजिबात पटलेला नव्हता. सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनी त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.  बोर्डाचे प्रमुख प्रसून जोशी यांनी स्पष्टपणे आपली नाराजी बोलून दाखवली. सेन्सॉर बोर्डाआधी मीडियाला चित्रपट दाखवून  निर्मात्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, असे प्रसून जोशी म्हणाले होते. 

बोर्डाकडून प्रमाणपत्र घेण्याआधी मीडियासाठी चित्रपटाचे खास स्क्रिनिंग ठेवले त्यानंतर राष्ट्रीय वाहिन्यांवर या चित्रपटाची समीक्षा सुरु आहे. हे निराशाजनक आहे, असे प्रसून जोशी एएनआयशी बोलताना म्हणाले होते. चित्रपटाला मंजुरी मिळावी यासाठी चित्रपटाचे निर्माते सेन्सॉर बोर्डावर दबाव आणत आहेत,  असे त्यांनी सांगितले. सेन्सॉरच्या प्रक्रियेला कमी लेखून संधीसाधूपणाचे हे एक उदहारण आहे, असेही जोशी म्हणाले होते.

पद्मावतीच्या रिव्यूसाठी या आठवडयात निर्मात्यांकडून अर्ज मिळाला. कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे स्वत: निर्मात्यांनी मान्य केले होते. चित्रपट काल्पनिक आहे की, ऐतिहासिक त्याचे डिसक्लेमरही टाकण्यात आले नव्हते. कागदपत्रे मागितल्यानंतर बोर्डावर उलटा आरोप करणे चुकीचे आहे, असे प्रसून जोशी म्हणाले. दुसरीकडे सध्या देशभरात पद्मावती चित्रपटाविरोधात जोरदार निदर्शने सुरु आहेत.

 

Web Title: Postponed the date of 'Padmavati' exposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.