पाकिस्तानचा खोटारडेपणा, जाधव गुप्तहेर असल्याचे पुरावेच नाहीत
By admin | Published: April 10, 2017 10:13 PM2017-04-10T22:13:45+5:302017-04-10T22:23:20+5:30
पाकिस्तानने सोमवारी भारताचे माजी नौसेना अधिकारी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. पाकिस्तान जाधव यांना भारताचा गुप्तहेर असल्याचं सांगत आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सोमवारी भारताचे माजी नौसेना अधिकारी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. पाकिस्तान जाधव यांना भारताचा गुप्तहेर असल्याचं सांगत आहे. पण या घटनाक्रमात समोर आलेल्या काही गोष्टींमुळे जाधव हे भारताचे गुप्तहेर नसल्याचे पुरावे समोर येत आहेत, त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे.
जाधव यांना भारतीय पासपोर्टसह पकडण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. या पासपोर्टवर त्यांचं दुसरं नाव हुस्नी मुबारक पटेल असल्याचं सांगण्यात आलंय. पण गुप्तहेरांकडे पासपोर्ट दिले जात नाहीत असं तज्ञांचं मत आहे. त्यामुळे पाकिस्तानचा हा दावा खोटा ठरतो.
याशिवाय स्वतः पाकिस्तान सरकारचे परराष्ट्र विषयक सल्लागार सरताज अजिज यांनी गेल्या वर्षी 7 डिसेंबरला केलेल्या एका विधानात जाधव यांच्याविरोधात भक्कम पुरावे नसल्याचं म्हटलं होतं. पाकिस्तानने ईराणमध्येही जाधव यांच्याबाबत चौकशी केलीपण त्यातूनही काही साध्य झालं नाही. पाकिस्तानने जाधव यांना अटक केल्याच्या एका महिन्यानंतर जाधव यांनी भारताचे गुप्तहेर असल्याचं कबुल केल्याचा एक व्हिडीओ सादर केला, पण तो व्हिडीओ खोटा असल्याचं भारतानं तेव्हाच सांगितलं होतं.
पाकच्या कैद्यांची सुटका रद्द-
भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानातील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर भारताने पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी कठोर पावलं उचलली असून पाकिस्तानच्या डझनभर कैद्यांना सोडण्याचा निर्णय भारताने तडकाफडकी रद्द केला आहे. भारताच्या ताब्यात असलेल्या पाकिस्तानच्या 12 कैद्यांना येत्या बुधवारी सोडण्यात येणार होते.
जाधव यांना फाशी म्हणजे हत्येचा पूर्वनियोजित कट,भारतानं ठणकावलं-
भारताचे माजी नौसेना अधिकारी कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा म्हणजे हत्येचा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप भारताकडून करण्यात आला आहे. जाधव यांना फाशी झाल्यास तो हत्येचा पूर्वनियोजित कट ठरेल अशा शब्दात भारताने पाकिस्तानला ठणकावले आहे.
कराची आणि बलुचिस्तानमध्ये घातपाताचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कुलभूषण जाधव यांना सोमवारी रावळपिंडीच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या या निर्णयाविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांना बोलावून विरोधाचे पत्र सोपवले.
या पत्रात भारताने कुलभूषण जाधव यांना शिक्षा सुनावली जाताना अनेक कायदेशीर हक्कांची पायमल्ली केल्याचे म्हटले आहे.तसेच पाकिस्तानने जाधव यांना बलुचिस्तानमध्ये पकडल्याचा दावा खोटा असून त्यांचे इराणमधून अपहरण करण्यात आलं होतं असा आरोप भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. जाधव यांच्यावर चालवण्यात आलेला खटला बनावट होता असं भारताने पाकला सांगितलं असून याशिवाय, कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली तर भारत त्याच्याकडे पूर्वनियोजित हत्येचा कट म्हणूनच पाहिल, असे या पत्रात म्हटले आहे.