गुंतवणूकदार व्हिसाच्या आधारे नीरव मोदीचा ब्रिटनमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 05:42 AM2019-03-16T05:42:58+5:302019-03-16T05:43:26+5:30

नीरव मोदी याने ब्रिटनमध्ये प्रवेश करण्याकरिता गुंतवणूकदारांसाठी असलेल्या ‘गोल्डन व्हिसा’चा वापर केल्याची माहिती समोर आली आहे.

Neerav Modi's entry into Britain on the basis of investor visa | गुंतवणूकदार व्हिसाच्या आधारे नीरव मोदीचा ब्रिटनमध्ये प्रवेश

गुंतवणूकदार व्हिसाच्या आधारे नीरव मोदीचा ब्रिटनमध्ये प्रवेश

Next

लंडन : पंजाब नॅशनल बँकेला सुमारे १४ हजार कोटींना फसवून फरार झालेला कुख्यात हिरे व्यावसायिक नीरव मोदी याने ब्रिटनमध्ये प्रवेश करण्याकरिता गुंतवणूकदारांसाठी असलेल्या ‘गोल्डन व्हिसा’चा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. युरोपीय संघाबाहेरील गुंतवणूकदारांना ब्रिटनकडून हा व्हिसा दिला जातो.

ब्रिटिश सरकारच्या रोख्यांत अथवा एखाद्या ब्रिटिश कंपनीच्या समभागांत २ दशलक्ष पौंडांची गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीस गोल्डन व्हिसा देण्यात येतो. नीरव मोदीला भारतीय पासपोर्टवरच गोल्डन व्हिसा देण्यात आला. त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. तथापि, त्याने फार पूर्वीच गोल्डन व्हिसा मिळविला.

गोल्डन व्हिसाद्वारे विदेशींना ब्रिटनमध्ये काम, शिक्षण वा व्यवसाय करण्याची परवानगी मिळते. एक रकमी गुंतविलेले २ दशलक्ष पौंड पाच वर्षे गुंतवून ठेवल्यास संबंधित व्यक्ती ब्रिटनमध्ये कायमस्वरूपी राहण्यास पात्र ठरतो. नीरव मोदी हा जानेवारी २०१८ पासून फरार असून, त्याला आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्याच्या विरुद्ध रेड कॉर्नर नोटीसही जारी झालेली आहे. पीएनबी घोटाळ्यात नीरव मोदीची पत्नी अ‍ॅमी हिचेही नाव आरोपपत्रात आहे. तीही फरार असून, तिच्याविरुद्धही ईडीतर्फे रेड कॉर्नर नोटीस निघणार आहे. (वृत्तसंस्था)

काँग्रेसचे टीकास्त्र
नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द केल्याचा दावा मोदी सरकारने केला. मग नीरव मोदी पॅरिस व बेल्जियमला कसा पोहोचला, त्याला लंडनमध्ये डायमंड होल्डिंग ही कंपनी कशी सुरू करता आली, असा सवाल शुक्रवारी काँग्रेसतर्फे करण्यात आला. पासपोर्ट रद्द केल्यानंतर मोदीने सहा देशांत प्रवास केला, याचा उल्लेख करून काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले की सरकारी मदत असल्याशिवाय असे कोणालाही करता येणार नाही.

Web Title: Neerav Modi's entry into Britain on the basis of investor visa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.