पंतप्रधानांवर टीका का करायची नाही? ते स्वत:ला देव समजतात का?- ओवैसी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 19:55 IST2018-12-03T19:53:17+5:302018-12-03T19:55:32+5:30
भाजपाच्या टीकेला असदुद्दीन ओवैसींचं प्रत्युत्तर

पंतप्रधानांवर टीका का करायची नाही? ते स्वत:ला देव समजतात का?- ओवैसी
हैदराबाद: तेलंगणात भाजपाची सत्ता आल्यास ओवैसी यांना निझामासारखं हैदराबाद सोडून पळावं लागेल, या भाजपाच्या टीकेला अकबरुद्दीन ओवैसी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान मोदी स्वत:ला देव समजतात का, असा सवाल ओवैसी यांनी विचारला आहे. आम्ही पंतप्रधानांबद्दल काहीच बोलायचं नाही का? ते स्वत:ला देव समजू लागले आहेत का?, अशा प्रश्नांचा भडिमार ओवैसी यांनी केला.
तेलंगणात भाजपाची सत्ता आल्यास ओवैसींना निझामासारखं हैदराबाद सोडून पळून जावं लागेल, असं विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी समाचार घेतला. 'आदित्यनाथ यांच्या विधानामागे मोदींची मानसिकता आहे. असे शब्द मोदींच्या मानसिकतेमधूनच येऊ शकतात,' असं म्हणत ओवैसींनी पंतप्रधानांवर घणाघाती टीका केली. मोदी स्वत:ला देव समजतात का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
AIMIM President Asaduddin Owaisi: A BJP CM said he’ll make us flee, should we not say anything to the PM? Has the PM proclaimed himself as a god? He’s a democratically elected leader and criticizing him is a constitutional right. #TelanganaElections2018pic.twitter.com/BC3CrkbebL
— ANI (@ANI) December 3, 2018
भाजपाचे मुख्यमंत्री आम्हाला पळवून लावण्याची भाषा करतात. आम्ही पंतप्रधानांना काहीच बोलायचं नाही का? पंतप्रधान स्वत:ला देव समजू लागले आहेत का? ते लोकशाहीच्या मार्गानं निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार आम्हाला घटनेनं दिला आहे, असं ओवैसी यांनी म्हटलं. ओवैसी यांना हैदाराबाद सोडून पळावं लागेल, या विधानालादेखील त्यांनी प्रत्युत्तर दिलं. 'भारत हा माझ्या अब्बूंचाही देश आहे. त्यामुळे कोणीही मला हाकलू शकत नाही,' असं ओवैसी म्हणाले.