'काश्मीरमधील दहशतवादी शहीद, ते आपल्या भावासारखे', पीडीपी आमदाराची मुक्ताफळे 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 12:45 PM2018-01-11T12:45:12+5:302018-01-11T13:00:33+5:30

'काश्मीरमधील दहशतवादी शहीद आहेत आणि ते आपल्या भावासारखे आहेत. त्यांच्यातील काहीजण अल्पवयीन आहेत ज्यांना आपण काय करतोय हेदेखील माहित नाही', असं एजाज अहमद मीर म्हणाले आहेत.

Militants who are from Kashmir are martyrs says PDP MLA cause controversy | 'काश्मीरमधील दहशतवादी शहीद, ते आपल्या भावासारखे', पीडीपी आमदाराची मुक्ताफळे 

'काश्मीरमधील दहशतवादी शहीद, ते आपल्या भावासारखे', पीडीपी आमदाराची मुक्ताफळे 

Next

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये एकीकडे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कर पुरेपूर प्रयत्न करत असताना, भाजपाच्या सहाय्याने सरकार चालवणा-या पीडीपीच्या एका आमदाराने वादग्रस्त विधान करत मुक्ताफलं उधळली आहेत. काश्मीरमधील दहशतवादी शहीद आहेत आणि ते आपल्या भावासारखे आहेत असं वादग्रस्त वक्तव्य पीडीपीचे आमदार एजाज अहमद मीर यांनी केलं आहे. एजाज अहमद मीर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पीडीपीसोबत भाजपा युतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 


'काश्मीरमधील दहशतवादी शहीद आहेत आणि ते आपल्या भावासारखे आहेत. त्यांच्यातील काहीजण अल्पवयीन आहेत ज्यांना आपण काय करतोय हेदेखील माहित नाही', असं एजाज अहमद मीर म्हणाले आहेत. सोबतच दहशतवाद्यांच्या मृत्यूचं आपण सेलिब्रेशन करण्याची गरज नाही. तेदेखील काश्मीरचे रहिवासी आहेत आणि हे आपलं अपयश आहे  असंही ते बोलले आहेत. 'जेव्हा आपले जवान शहीद होतात तेव्हादेखील आपल्याला दुख: होतं. ज्याप्रमाणे आपण जवानांच्या पालकांची सांत्वना करतो त्याचप्रमाणे दहशतवाद्यांच्याही करायला हवं', अशी मुक्ताफळे त्यांनी यावेळी उधळली. 


यादरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी एजाज अहमद मीर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, 'दहशतवादी आणि फुटीरवादी काश्मीर, काश्मीरी नागरिक, शांतता आणि विकासाचे शत्रू आहे. ते कोणाचे भाऊ कसे असू शकतात ?'.


जम्मू काश्मीर पोलिसांनी स्थानिक दहशतवाद्यांना दहशतवादाचा मार्ग सोडून पुन्हा घरी परतण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी त्यांनी एक हेल्पलाइनही सुरु केली आहे. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरमधील हिंसाचार थांबवण्यासाठी पाकिस्तानसोबत चर्चा सुरु करण्यासाठी समर्थन दर्शवलं होती. यावर बोलताना एजाज अहमद मीर बोलले की, 'आता वेळ आली आहे जेव्हा हुरियत, फुटीरवाद्यांशी चर्चा केली गेली पाहिजे. जेणेकरुन सुरु असलेला संघर्ष थांबवता येईल. दोन्ही देशांनी काश्मीर मुद्द्यावर चर्चा सुरु केली पाहिजे'.

Web Title: Militants who are from Kashmir are martyrs says PDP MLA cause controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.