महाराष्ट्रातील एका मंत्र्याची पीएचडी बोगस; सत्यपाल सिंह यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 03:31 PM2018-03-02T15:31:01+5:302018-03-02T15:31:01+5:30

पीएचडीची पदवी घेतलेल्या अनेकांना पीएचडी शब्दाचा लाँगफॉर्मही सांगता येत नाही. त्या त्या विषयाचे व्यवस्थित आणि सविस्तर ज्ञान नसताना देखील पदवी घेऊन बसले आहेत.

Maharashtra minister having bogus phd says Satyapal singh | महाराष्ट्रातील एका मंत्र्याची पीएचडी बोगस; सत्यपाल सिंह यांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्रातील एका मंत्र्याची पीएचडी बोगस; सत्यपाल सिंह यांचा गौप्यस्फोट

Next

रेनिगुंठा, (आंध्र प्रदेश) : पीएचडीची पदवी घेणाऱ्या व्यक्तीकडे त्या संपूर्ण विषयाची माहिती आणि ज्ञान असेलच असे नाही. बोगस पदव्यांचा सुळसुळाट झाला आहे. महाराष्ट्रातील एका मंत्र्याची पीएचडी अशीच बोगस आहे, असा गौप्यस्फोट केंद्रीय मनुष्य विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी गुरुवारी जाहीर भाषणात केला. त्यामुळे आता ते मंत्री नेमके कोण, याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे.

पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आंध्र प्रदेशातील तिरुपती आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ उभारण्यात आलेल्या 'फर्ग्युसन सेंटर फॉर हायर लर्निंग'चे उदघाटन डॉ. सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी ‌डॉ. सिंग म्हणाले, 'पीएचडीची पदवी घेतलेल्या अनेकांना पीएचडी शब्दाचा लाँगफॉर्मही सांगता येत नाही. त्या त्या विषयाचे व्यवस्थित आणि सविस्तर ज्ञान नसताना देखील पदवी घेऊन बसले आहेत. महाराष्ट्रातील एका मंत्र्यांने अशाच प्रकारे बोगस पीएचडी पदवी मिळवली आहे. त्या मंत्र्याने मला त्यांनी पीएचडी केलेल्या विषयाची माहिती दिली होती. मात्र, तो विषय इथे सांगण्यालायकदेखील नाही." 
त्या मंत्र्याने ज्या विद्यापीठातून ही पदवी मिळवली होती. तिथल्या संबधित विभागाच्या प्रमुखांना मी फोन केला. या विषयात पीएचडी करण्यास तुम्ही मान्यताच कशी दिली, अशी विचारणा मी त्यांना केली होती. तेव्हा वरिष्ठ पातळीवरून त्या विषयाला मान्यता आणि त्याचबरोबर पदवी देण्यास माझ्यावर दबाव आल्याचे त्यांनी सांगितले, अशी धक्कादायक माहिती सत्यपाल सिंह यांनी दिली. केवळ महाराष्ट्र नाही तर उत्तर प्रदेशात देखील असे प्रकार होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान कार्यक्रम संपल्यानंतर तो मंत्री कोण याबाबत डॉ. सत्यपाल सिंह यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला. मात्र माझे नाव 'सत्य'पाल आहे', असे म्हणून मी जे बोलतो ते खरंच बोलतो, असा  निर्वाळा त्यांनी दिला. 


डार्विनबाबतच्या विधानामुळे चर्चेला सुरुवात
‌डार्विन यांच्या सिध्दांताबाबत सत्यपाल सिंह यांनी केलेल्या विधानामुळे देशभर प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, "मी माझे वैयक्तिक मत मांडले होते. मी देखील विज्ञानाचा विद्यार्थी होतो आणि आहे. विज्ञान हे विविध प्रकारच्या चर्चा आणि विरोधातून वाढते. माझ्या विधानामुळे या विषयावरील चर्चेला तोंड फुटले. 
असे मत मांडणार मी पहिला नाही. यापूर्वीही अनेकांनी असे मत व्यक्त केले आहे. मी केलेल्या विधानानंतर मात्र त्यावर प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा सुरु झाली. काही ठिकाणी परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने चर्चेला सुरुवात झाली ही चांगली गोष्ट आहे, असे सत्यपाल सिंह यांनी सांगितले. 

Web Title: Maharashtra minister having bogus phd says Satyapal singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.