भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख अर्जन सिंग यांना देण्यात आला अखेरचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 08:29 AM2017-09-18T08:29:08+5:302017-09-18T11:19:13+5:30

भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख आणि मार्शल ऑफ एअरफोर्स अर्जन सिंग (वय ९८ वर्षे) यांचे शनिवारी (16 सप्टेंबर) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Last rites ceremony of Marshal of Air Force ArjanSingh | भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख अर्जन सिंग यांना देण्यात आला अखेरचा निरोप

भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख अर्जन सिंग यांना देण्यात आला अखेरचा निरोप

googlenewsNext

नवी दिल्ली, दि. 18 -  भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख आणि मार्शल ऑफ एअरफोर्स अर्जन सिंग (वय ९८ वर्षे) यांना अखेरचा निरोप देण्यात आला आहे. सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर नवी दिल्लीतील ब्रार चौकात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.   अर्जन सिंह यांच्या सन्मानार्थ सर्व शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले आहेत.  अर्जन सिंह यांना अखेरचा निरोप देण्यासाठी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते. शिवाय, तिन्ही दलांचे प्रमुखही तेथे उपस्थित होते.  

अर्जन सिंग यांचे शनिवारी (16 सप्टेंबर) वृद्धापकाळानं निधन झाले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळाल्यानंतर हवाई दलाचे प्रमुख बी.एस.धनवा, केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. हवाईदलाने अर्जन सिंह यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली होती.  अखेर शनिवारी त्यांचं निधन झालं. पाच स्टार मिळवणारे अर्जन सिंह एकमेव अधिकारी होते. वयाच्या 45 व्या वर्षी सर्वात तरुण हवाईदल प्रमुख होण्याचा मान त्यांना मिळाला होता. हवाईदलात सेवा बजावताना 60 वेगवेगळ्या प्रकारची विमाने त्यांनी उडवली. 1965 साली भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. 1969 रोजी अर्जन सिंह सेवानिवृत्त झाले. 

दरम्यान, 'अर्जन सिंग यांचं योगदान कायम स्मरणात राहिल. अर्जन सिंग यांनी देशाच्या संरक्षण क्षेत्राची ताकद वाढवली', अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली.

७० वर्षांची स्फूर्तिदायी कारकीर्द
भारतीय हवाई दलाचे पहिले आणि एकमेव मार्शल अर्जन सिंग यांनी आधी हवाई दलाचे प्रमुख म्हणून व नंतर राज्यपाल, प्रशासक व राजदूत म्हणून सुमारे ७० वर्षांच्या स्फूर्तिदायी कारकीर्दीत बहुमोल देशसेवा केली. लष्करातील ‘फिल्ड मार्शल’शी समकक्ष असा हवाईदलाचे ‘मार्शल’ असा सर्वोच्च पंचतारांकित हुद्दा देऊन सरकारनेही या बहाद्दर योद्ध्याचे ऋण मान्य केले. आॅगस्ट १९६४ मध्ये अर्जन सिंग हवाई दलाचे प्रमुख झाले, तेव्हा या दलातील सर्वात मोठा हुद्दा ‘एअर मार्शल’ असा होता. १९६५ मधील पाकिस्तानसोबतचे युद्ध जिंकण्यात त्यांच्या नेतृत्वाखाली हवाई दलाने जी निर्णायक भूमिका बजावली, त्याबद्दल अर्जन सिंग यांना ‘पद्मविभूषण’ हा दुसरा सर्वोच्च नागरी बहुमान दिला गेला. तसेच हवाईदल प्रमुखाचा हुद्दा वाढवून तो ‘एअर चीफ मार्शल’ असा केला गेला. अशा प्रकारे अर्जन सिंग भारतीय हवाई दलाचे पहिले ‘एअर चीफ मार्शल’ झाले.

जानेवारी २००२ मध्ये सरकारने अर्जन सिंग यांना ‘मार्शल आॅफ एअर फोर्स’ हा सर्वोच्च हुद्दा निवृत्तीनंतर बहाल केला. या दर्जाचा सैन्यदलातील हुद्दा मिळालेले हवाई दलाचे अर्जन सिंग व लष्कराचे ‘फिल्ड मार्शल’ सॅम माणेकशा हे भारतातील फक्त दोनच अधिकारी आहेत.

गेल्याच वर्षी अर्जन सिंग यांच्या ९७ व्या वाढदिवसानिमित्त आसाममधील पनागढ हवाई तळाला ‘एअर फोर्स स्टेशन अर्जन सिंग’ असे नाव दिले गेले. जिवंत अधिका-याचे नाव हवाई तळाला दिले जाण्याची ही एकमेव घटना आहे. हवाई दलातून सन १९६९ मध्ये वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतरही सुमारे ४७ वर्षे अर्जन सिंग यांनी अनेक प्रकारे आपल्या सेवा देशाला दिल्या. ते स्वित्झर्लंडमधील भारताचे राजदूत व केनियामधील उच्चायुक्त होते. त्यानंतर त्यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणूनही जबाबदारी सांभाळली.

- जन्म १५ एप्रिल १९१९, ल्यालपूर (आता पाकिस्तानात).

- कॉलेजमध्ये शिकत असतानाच वयाच्या १९ व्या वर्षी शाही ब्रिटिश हवाई दलात प्रशिक्षार्थी वैमानिक म्हणून निवड.

- हवाई दलात दाखल झाल्यावर पहिली कामगिरी वायव्य सरहद्द प्रांतात.

- जपानची मुसंडी रोखण्यासाठी झालेल्या आराकान मोहिमेत स्वाड्रन लीडर म्हणून सहभाग.

- पहिल्या महायुद्धात मित्र राष्ट्रांच्या फौजांच्या रंगूनपर्यंतच्या मुसंडीत स्वाड्रन लीडर म्हणून मोलाची कामगिरी. त्याबद्दल विशेष पदकाने गौरव.

- भारत स्वतंत्र झाल्यावर १५ आॅगस्ट १९४७ रोजी पहिल्या स्वातंत्र्य दिनी हवाई दलाच्या १०० विमानांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या ‘प्लायपास्ट’चे नेतृत्व.








Web Title: Last rites ceremony of Marshal of Air Force ArjanSingh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.