Jammu-Kashmir: अवंतीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, एक दहशतवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 08:57 AM2021-08-20T08:57:48+5:302021-08-20T08:58:00+5:30
Jammu kashmir encounter: यापूर्वी गुरुवारी श्रीनगरच्या सराफ कदल परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात दोन पोलीसांसह तीन जण जखमी झाले होते.
श्रीनगर: जम्मू -काश्मीरमधील अवंतीपोराच्या पंपोर भागात शुक्रवारी पहाटे सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. मात्र, मारलेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. यापूर्वी गुरुवारी श्रीनगरमधील सराफ कडल भागात सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात दोन पोलिसांसह तीन जण जखमी झाले होते.
दरम्यान, गुरुवारी जम्मू -काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील थानामंडी भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला, तर या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जेसीओही शहीद झाला. यानंतर दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी थानामंडी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.
राजौरीमध्ये 6 ऑगस्टला झाली होती चकमक
अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय सैन्याच्या शोध मोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली, यानंतर भारतीय सैन्याकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं. यापर्वी, 6 ऑगस्टला सुरक्षा दलांनी याच भागात दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.