यंदा ९७ टक्के पाऊस... दुष्काळाची मिटली छाया, बळीराजावर वरुणाची माया!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 03:55 PM2018-04-16T15:55:01+5:302018-04-16T15:55:01+5:30

यावर्षी दुष्काळ पडण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याची शुभवार्ता हवामान खात्याने दिली आहे.

India expected to receive 97% normal monsoon Met Department | यंदा ९७ टक्के पाऊस... दुष्काळाची मिटली छाया, बळीराजावर वरुणाची माया!

यंदा ९७ टक्के पाऊस... दुष्काळाची मिटली छाया, बळीराजावर वरुणाची माया!

Next

नवी दिल्लीः दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, पिकाला भाव न मिळणं, यासारख्या एक-ना-अनेक संकटांचा सामना करत, परिस्थितीपुढे हार न मानणाऱ्या बळीराजाला आज हवामान खात्याने मोठा दिलासा दिला आहे. यावर्षी देशात सरासरीच्या ९७ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून दुष्काळ पडण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याची शुभवार्ता त्यांनी दिली आहे. 

काही दिवसांपूर्वी भारतात यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेट या संस्थेने वर्तवला होता. 'स्कायमेट'ने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनची दीर्घकाळातील सरासरी ही समाधानकारक राहील. यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात. मात्र, या गोष्टी वगळता जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सरासरी ८८७ मिमी पाऊस पडेल, असं 'स्कायमेट'ने म्हटलं आहे.

भारतातील बहुतांश शेती आणि पर्यायाने इतर उद्योगधंदे पावसाच्या गणितावर अवलंबून असतात. त्यामुळे हवामान खात्याच्या पावसाविषयीच्या अंदाजाकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेलं असतं. या अंदांजावर बाजारपेठेत अनेक चढउतारही पाहायला मिळतात. साहजिकच स्कायमेटने आज जाहीर केलेल्या अंदाजामुळे शेतकरी आणि उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, भोपाळ, इंदौर, जबलपूर आणि रायपूर या शहरांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटलं.  तर अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि सुरत या शहरांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल. जून ते सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक पाऊस जून आणि सप्टेंबरमध्ये पडणार, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, मान्सूनचे संभावित वितरण

• ५% शक्यता जास्त पावसाची (हंगामी पाऊस ११०% पेक्षा जास्त आहे)
• २०% शक्यता सामान्यपेक्षा अधिक पावसाची (हंगामी पर्जन्य १०५% ते ११०% च्या दरम्यान)
• ५५% शक्यता सर्वसाधारण पाऊस होण्याची (हंगामी पर्जन्यमान ९६ ते १०४% च्या दरम्यान)
• २०% शक्यता सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची (हंगामी पर्जन्य ९०% ते ९५% च्या दरम्यान)
• ०% शक्यता दुष्काळ होण्याची (हंगामी पाऊस ९०% पेक्षा कमी)

पावसाचे मासिक वितरण

जून - दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत १११% (जूनसाठी दीर्घकालीन सरासरी = १६४ मिमी)

• सामान्य पावसाची ३०% शक्यता
• सामान्यपेक्षा जास्त पावसाची ६०% शक्यता
• सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची १०% शक्यता

जुलै - दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत ९७% (जुलैसाठी दीर्घकालीन सरासरी = २८९ मिमी)

• सामान्य पावसाची ५५% शक्यता
• सामान्यपेक्षा जास्त पावसाची १५% शक्यता
• सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची ३०% शक्यता

ऑगस्ट- दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत ९६% (ऑगस्ट साठी दीर्घकालीन सरासरी = २६१ मिमी)

• सामान्य पावसाची ५५% शक्यता
• सामान्यपेक्षा जास्त पावसाची १०% शक्यता
• सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची ३५% शक्यता

सप्टेंबर- दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत १०१% (सप्टेंबर साठी दीर्घकालीन सरासरी = १७३ मिमी)

• सामान्य पावसाची ६०% शक्यता
• सामान्यपेक्षा जास्त पावसाची २०% शक्यता
• सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची २०% शक्यता

Web Title: India expected to receive 97% normal monsoon Met Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.