सुसाईड नोटमध्ये काँग्रेस आमदाराचं नाव, ४०० कोटींना फसवल्याचा कंपनी मालकाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 18:04 IST2019-06-13T17:07:10+5:302019-06-13T18:04:32+5:30
'आमदार रोशन बेग यांनी 400 कोटी रुपये परत केले नाही, त्यामुळे मी आत्महत्या करण्यासाठी जात आहे.'

सुसाईड नोटमध्ये काँग्रेस आमदाराचं नाव, ४०० कोटींना फसवल्याचा कंपनी मालकाचा आरोप
नवी दिल्ली : बंगळुरुमध्ये जवळपास 1500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. येथील आएमए (IMA) कंपनीचा मालक मसूर खान याच्याविरोधात आतापर्यंत फसवणूक केल्याच्या जवळपास 20 हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. कंपनीच्या मालकाने एका ऑडिओ मेसेजमध्ये शिवाजीनगरचे काँग्रेस आमदार रोशन बेग यांच्यावर 400 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. तर, याप्रकरणी सरकारने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मसूर खान यांची एक सुसाईड नोट समोर आली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की,'आमदार रोशन बेग यांनी 400 कोटी रुपये परत केले नाही, त्यामुळे मी आत्महत्या करण्यासाठी जात आहे.' मसूर खान सध्या बेपत्ता आहेत. या घटनेमुळे आमदार रोशन बेग यांच्या समस्या वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी कर्नाटकातकाँग्रेस नेतृत्वाविरोधात आवाज उठवला होता म्हणून याप्रकरणात मला जाणीवपूर्वक फसविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे रोशन बेग यांनी म्हटले आहे. रोशन बेग म्हणाले, 'जेव्हा मी म्हणालो की मुस्लिम लोकांनी कोणाच्याही पाठीमागून जावू नये. तर लोक माझ्या पाठिमागे लागले. मी एसआयटीच्या चौकशीचे स्वागत करतो. जीएससी आणि इतर कायदे असताना 400 कोटी रुपये कोण, कशाला देईल.'
दरम्यान, आपल्या माहितीसाठी इस्लाममध्ये व्याज देणे अथवा घेणे गैर मानले जाते. बहुतांश मुस्लिम समाज बँकेत खाते उघडत नाहीत. त्यांचे सर्व व्यवहार हे रोखीनेच होतात. अशातच या मात्र कंपनीने व्याजाला नफ्याचे नाव दिले आणि एक लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर वर्षाला 36 हजार रुपये देण्याचा दावा केला. त्यामुळे गुंतवणूक केलेल्या अनेक लोकांचे पैसे यामध्ये बुडाले आहेत.