अण्णा हजारेंच्या आंदोलनाला लांबूनच शुभेच्छा; राजू शेट्टींनी सांगितलं दुराव्याचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 01:01 PM2018-03-27T13:01:37+5:302018-03-27T13:01:37+5:30

अनेकदा विनंती करूनही अण्णा हजारे शेतकऱ्यांच्या पदयात्रेत सहभागी झाले नव्हते.

I will never join Anna Hazare andolan in Ramleela ground says Raju Shetty | अण्णा हजारेंच्या आंदोलनाला लांबूनच शुभेच्छा; राजू शेट्टींनी सांगितलं दुराव्याचं कारण

अण्णा हजारेंच्या आंदोलनाला लांबूनच शुभेच्छा; राजू शेट्टींनी सांगितलं दुराव्याचं कारण

नवी दिल्ली: शेतकऱ्यांसाठी राक्षसांनी, भूतांनी आंदोलन केले तरी आमचा त्याला पाठिंबा असेल. याच न्यायाने अण्णा हजारेंच्या रामलीला मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनालाही माझा पाठिंबा आहे. परंतु, मी या आंदोलनात सहभागी होणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सांगितले. ते मंगळवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अण्णांच्या आंदोलनात सहभागी होण्यास नापसंती दर्शविली. यापूर्वी आम्ही शेतकऱ्यांच्या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी अण्णा हजारे यांना विनंती केली होती. रस्त्यात कुठेही थोड्यावेळासाठी तुम्ही शेतकऱ्यांना भेटलात तर त्यांचा उत्साह दुणावेल, असे आम्ही त्यांना सांगितले होते. मात्र, अनेकदा विनंती करूनही अण्णांनी त्याकडे दुर्लक्ष केले, अशी खंत यावेळी राजू शेट्टी यांनी बोलून दाखविली. 

याशिवाय, लोकप्रतिनिधी असल्यामुळे मी अण्णांच्यादृष्टीने अस्पृश्य आहे. त्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन मला स्वत:चा अपमान करून घ्यायचा नाही. तसेच अण्णांच्या या आंदोलनाचे नियोजन करणाऱ्या काही व्यक्तींची पार्श्वभूमीही संशयास्पद आहे. त्यामुळे आम्ही या आंदोलनापासून चार हात लांब राहणेच पसंत केले आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अगदी राक्षसांनी, भूतांनी आंदोलन केले तरी आमचा त्याला पाठिंबा आहे. फक्त त्यांचा हेतू सच्चा हवा, असे राजू शेट्टी यांनी म्हटले. मी अण्णांच्या आंदोलनात सहभागी होणार नसलो तरी दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मी संसदेत मांडत असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. 

२३ मार्चपासून अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीच्या रामलीला मैदानात उपोषण सुरु केले आहे. दिल्लीत गेल्यावेळी मिळालेला तेवढा प्रतिसाद मिळत नसला तरी दिल्लीचा ऊन्हाळा सुरु झाला आहे. वाढत्या तापमानात अण्णांची प्रकृती जास्तच खालावली तर जनप्रक्षोभ उसळण्याची भीती आहे. त्यामुळे भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी उपोषणाला गंभीरतेने घेतले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजनांच्या माध्यमातून त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न करत आहेत. मात्र अण्णांनी अजूनपर्यंत त्याला दाद दिलेली नाही. 
 

Web Title: I will never join Anna Hazare andolan in Ramleela ground says Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.