समाजात विष पसरलंय; मुलांची चिंता वाटते- नसीरुद्दीन शहा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 03:55 PM2018-12-20T15:55:53+5:302018-12-20T16:05:04+5:30

देशातील सद्यस्थितीवर नसीरुद्दीन शहांचं भाष्य

i fear for my childrens in india says naseeruddin shah speaks over bulandshahr violence | समाजात विष पसरलंय; मुलांची चिंता वाटते- नसीरुद्दीन शहा

समाजात विष पसरलंय; मुलांची चिंता वाटते- नसीरुद्दीन शहा

Next

मुंबई: समाजात विष पसरल्यानं आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, असं विधान ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात तथाकथित गोरक्षकांनी एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली होती. त्या घटनेवर शहा यांनी भाष्य केलं आहे. भारतातील सद्यस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. आता गाईचा जीवन माणसापेक्षा महत्त्वाचा झाला आहे, असं ते म्हणाले. 

3 डिसेंबरला बुलंदशहरात गोहत्येवरुन तणाव निर्माण झाला. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावानं हल्ला केला. यामध्ये पोलीस निरीक्षकासह एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल बोलताना नसीरुद्दीन शहांनी देशातील घडामोडींवरही भाष्य केलं. 'देशातील सध्याच्या परिस्थितीचा मला प्रचंड राग येतो. मला माझ्या मुलांची चिंता वाटते,' असं शहांनी म्हटलं. ते एका संकेतस्थळाशी बोलत होते. 

'सध्या देशात गाईचा जीव माणसापेक्षा जास्त मौल्यवान झाला आहे. गाईचे प्राण पोलीस अधिकाऱ्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहेत. समाजात विष पसरलं आहे. या परिस्थितीची मला खूप भीती वाटते. अचानक जमावानं माझ्या मुलांना घेरलं आणि तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम असा प्रश्न त्यांना विचारला, तर काय होईल', अशा शब्दांमध्ये त्यांनी देशातील परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली. 

देशातील सध्याच्या परिस्थितीचा चीड येते, असंदेखील शहा म्हणाले. 'कायदा अगदी बिनधास्तपणे हातात घ्यावा, यासाठी लोकांना पूर्णपणे मोकळीक देण्यात आली आहे. याची मला अतिशय चीड येते. देशातील परिस्थिती चिंताजनक आहे. लोकांनादेखील याबद्दल संताप वाटला पाहिजे. हे आमचं घर आहे आणि यातून कोण आम्हाला बाहेर काढू शकतो, असा विचार लोकांच्या मनात यायला हवा,' असं शहा यांनी म्हटलं.

Web Title: i fear for my childrens in india says naseeruddin shah speaks over bulandshahr violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.