हुर्रियत नेत्यांचा धूर्तपणा! पाकिस्तानच्या पैशातून माजवली दहशत, उभारली प्रॉपर्टी!
By Admin | Updated: June 7, 2017 16:59 IST2017-06-07T16:56:55+5:302017-06-07T16:59:29+5:30
काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी फुटिरतावाद्यांना पाकिस्तानकडून आर्थिक रसद पुरवली जाते हे आता उघड झाले आहे

हुर्रियत नेत्यांचा धूर्तपणा! पाकिस्तानच्या पैशातून माजवली दहशत, उभारली प्रॉपर्टी!
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी फुटिरतावाद्यांना पाकिस्तानकडून आर्थिक रसद पुरवली जाते हे आता उघड झाले आहे. गेल्या आठ वर्षात दहशत माजवण्यासाठी पाकिस्तानने हुर्रियतच्या नेत्यांना तब्बल 1500 कोटी रुपये देण्यात आल्याचे हुर्रियत नेत्यांच्या घरांवर टाकण्यात आलेल्या छाप्यातून उघड झाले आहे. मात्र लबाड हुर्रियत नेत्यांनी यातील अर्ध्या पैशातून काश्मीरमध्ये अशांतता माजवली तर अर्धे पैसे स्वत:ची मालमत्ता बनवण्यामध्ये गुंतवले.
एनआयएने शनिवार आणि रविवारी हुर्रियत नेत्यांच्या श्रीनगर, जम्मू, दिल्ली आणि हरियाणा येथील तीन डझन ठिकाणांवर धाडी टाकल्या होते. मनी लॉण्ड्रींग आणि पाकिस्तानकडून हुर्रियत नेत्यांना पैसे मिळत असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. या धाडींदरम्यान, तीन कोटी रुपयांची रोख रक्कम आणि कोट्यवधीची संपत्ती उघड झाली होती. तसेच कारवाईदरम्यान मिळालेल्या अन्य कागदपत्रांचा तपास सुरू आहे.
1990 नंतर प्रथमच हुर्रियत नेत्यांना मिळणाऱ्या आर्थिक रसदीवर नियंत्रण आणण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली आहेत. दरम्यान, आतापर्यंत झालेल्या चौकशीत ज्या बाबी समोर आल्या आहेत त्यात हुर्रियत नेत्यांनी पाकिस्तानकडून फंड घेऊन खोऱ्यात दहशतवाद वाढवण्यासाठी मोर्चेबांधणी केली. तसेच यातील बरीचशी रक्कम स्वत:ची मालमत्ता वाढवण्यासाठी गुंतवली.