तुमच्या मुलाला सोशल मीडियाचं व्यसन आहे का ?....मग हे वाचाच

By शिवराज यादव | Published: August 3, 2017 07:28 PM2017-08-03T19:28:09+5:302017-08-04T11:15:27+5:30

आपली स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा वयात सोशल मीडियाच्या आहारी गेलेली मुलं कधी स्वत:ला हरवून बसतात हे त्यांचं त्यांनाच कळत नाही

How to help children from getting addicted to social media | तुमच्या मुलाला सोशल मीडियाचं व्यसन आहे का ?....मग हे वाचाच

तुमच्या मुलाला सोशल मीडियाचं व्यसन आहे का ?....मग हे वाचाच

मयुरा अमरकांत/शिवराज यादव

मुंबई, दि. 3 - मुलं जसजशी मोठी होत जातात तसंतसं नवीन गोष्टी शिकण्यासाठी त्यांच्यातील कुतुहूल वाढत असतं. आपल्या मित्रांमध्ये रमण्याच्या वयात मुलं तासनतास सोशल मीडियावर पडलेली दिसतात. सोशल मीडियावर अपडेटेड नसणं किंवा त्याबद्दल माहिती नसणं आजकाल खूपच अज्ञानपणाचं लक्षण समजलं जातं. आपण नवं तंत्रज्ञान तसंच सोशल मीडियाच्या बाबतीत अलित्त म्हणा किंवा अडाणी राहू नये यासाठी सोशल मीडियात केलेला प्रवेश व्यसन कधी बनतो हे मुलांना कळतंच नाही. आपली स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा वयात सोशल मीडियाच्या आहारी गेलेली मुलं कधी स्वत:ला हरवून बसतात हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. अशावेळी आपली मुलं नेमका किती वेळ सोशल मीडियाचा वापर करतात याकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे.

ही चर्चा करण्याचं मुख्य कारण म्हणजे मुंबईत नुकतंच समोर आलेलं एक प्रकरण. अंधेरीत 13 वर्षाच्या चिमुरड्याने ब्ल्यू व्हेल गेमच्या नादात आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. हे सर्व कशासाठी तर ब्ल्यू व्हेलमध्ये देण्यात आलेलं आव्हान पुर्ण करण्यासाठी. ज्या वयात आयुष्याची ख-या अर्थाने सुरुवात होणार असते, तिथे हे आयुष्य संपवण्याचा विचार मुलांच्या मनात येणं खरंच धक्कादायक आहे.

या घटनेने पालकांची चिंता मात्र वाढली आहे. आपला मुलगा सोशल मीडियावर प्रसिद्ध असणे अनेकांसाठी अभिमानाची गोष्ट असते, मात्र या घटनेमुळे ही प्रसिद्धी त्याच्या जीवावर तर उठणार नाही ना अशी चिंता सतावू लागली आहे. आपल्या मुलांना सूट देऊन हवंतसं आयुष्य जग म्हणून सांगणारे पालकही आता मुलांच्या खासगी आयुष्यात डोकावून सर्व काही ठीक आहे की नाही याची पडताळणी करत आहेत. 

एक पालक म्हणून मुलांची काळजी वाटणं साहजिक आहे. पण ही काळजी फक्त त्यांचं आरोग्य, शिक्षणापुरती मर्यादित नसावी. मुलांच्या हातात मोबाईल देताना तो नेमका किती आणि कसा वापरावा याबद्दल मुलांशी चर्चा करणंही तितकंच महत्वाचं आहे. मुलांना मोबाईल हातात मिळाल्यावर चेह-यावर दिसणारा आनंद तो वापरायला लागल्यावरही टिकून आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी पालक म्हणून आपलीच असते. 

अशाच काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत, जी तुमच्या मुलांना सोशल मीडियाच्या आहारी जाऊन स्वत:च्या जिवाचं बरं वाईट करण्यापासून रोखू शकतात. 

1) शांत रहा, घाबरुन जाऊ नका
तुम्ही ज्या प्रकारे परिस्थिती हाताळता त्यावर ती चांगली की वाईट ठरत असते. सर्वात आधी स्वत:वर आणि तुम्ही केलेल्या संस्कारांवर विश्वास ठेवा. इंटरनेट किंवा सोशल मीडियावर असणारी प्रत्येक गोष्ट वाईट असतेच असं नाही. जर का व्यवस्थित वापर केला तर खूप चांगली माहितीही हाती लागते. ज्ञान वाढवण्यातही मदत मिळते. फक्त तुमची मुलं योग्य वापर करतील याची काळजी घ्या. 

2) सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांना काय दाखवलं जातं याची माहिती घ्या
हा पर्याय अनेकांना पटणार नाही, मात्र फायद्याचा ठरु शकतो. जिथे आपल्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे तिथे थोडीशी चिटिंग केल्याने काही फरक पडत नाही. एक जी-मेल आयडी तयार करा ज्यामध्ये तुमचं वय 14 ते 15 च्या आसपास असल्याचं सांगा. यानंतर त्याच अकाऊंटच्या मतदीने फेसबूक, इन्स्टाग्रामवरही अकाऊंट तयार करा. याच मेल आयडीच्या मदतीने यूट्यूबला साईन इन करा. यानंतर तुमचं वय आणि तुम्ही नोंद केलेल्या आवडी लक्षात घेता या सर्व ठिकाणांहून तुम्हाला काही गोष्टी स्वत:हून ऑफर करण्यात येतील. यावरुन तुम्हाला 14-15 वर्षाच्या मुलांना सोशल मीडियावर कोणता कंटेंट दाखवल जातो याची कल्पना येईल. 

3) मुलाचा फोन तुमच्या जी-मेलशी कनेक्ट करा
असं केल्यास चॅट बॅकअप, फोन हिस्ट्री आणि फोटो गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह येतील, जे पाहणं तुम्हाला शक्य होईल. यामुळे मुलांच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची भीती तुमच्या मनात येणं साहजिक आहे. मात्र जोपर्यंत मुलांना काय योग्य आणि काय वाईट यातील फरक कळत नाही, तोपर्यंत त्यांच्यासाठी हे करणं चुकीचं नाही. कारण प्रश्न त्यांच्या सुरक्षेचा आहे. जर का तुम्हाला काही आक्षेपार्ह आढळलं, तर त्यावर लगेच रिअॅक्ट न होता शांतपणे संवाद साधा.

4) सोशल मीडियावर ब्ल्यू व्हेलसारख्या अनेक धोकादायक गोष्टी आहेत, ज्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. ट्रोलिंग, पॉर्न शेअरिंग सारख्या गोष्टींमध्येही मुलं अडकली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवा. संवाद हाच सर्वोत्तम उपाय असून यामुळे सर्व गोष्टी सहज होऊन जातील. 

5) सांगू नका, संवाद साधा
आपल्या मुलांना सतत उपदेश देण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधा. आपण दिवसातील किती वेळ मुलांना देतो याचा नक्की विचार करा. तुमच्या मुलांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा असं नातं प्रस्थापित करण्यात तुम्हाला यश मिळालं आहे का ? तुमच्या मुलाशी तुम्ही मनमोकळेपणाने गप्पा मारता का ? या प्रश्नांची उत्तरे मिळवा. जर उत्तर नाही असेल तर सर्वात आधी याला प्राथमिकता देण्याची गरज आहे. 

6) विश्वास आणि आत्मविश्वास वाढवा
मुलांमधील आत्मविश्वास आणि त्यांचा तुमच्यावरील विश्वास वाढवा. कोणत्याही मुलाला त्याच्याविषयी मतप्रदर्शन केलेलं आवडत नाही, खासकरुन आपल्या प्रियजनांकडून. अनेक मुलांना प्रेम मिळत नसल्याने, एकटं वाटत असल्याने ब्ल्यू व्हेलसारख्या जीवघेण्या खेळाकडे वळतात. आई-वडिल सतत व्यस्त असल्याने खायला उठणारा तो एकाकीपणा मग सोशल मीडियामध्ये आपलेपणा शोधू लागतो. त्यामुळे जर मुलांना आत्मविश्वास दिला, त्यांच्याशी मैत्रीचं नात ठेवलं तर अशा ब्ल्यू व्हेलसारख्या जीवघेण्या गोष्टींकडे वळण्याचा विचारही मनात येत नाही. 

7) मुलांसोबत शेअरिंग वाढवा
घरामध्ये खेळीमेळीचं वातावरण तयार करा. मुलांसोबत अनेक गोष्टी शेअर करा, तुमच्या आयुष्यात किती चढ-उतार आले. कशाप्रकारे तुम्ही यश मिळवलं या गोष्टी मुलांसोबत शेअर करा. मुलांसोबत जास्त आपुलकीने वागल्यास एखादा पासवर्ड सांगताना त्यांना भीतीही वाटणार नाही. तुम्ही फार कमी वापरत असलेल्या एखाद्या अकाऊंटचा पासवर्ड तुम्हीही शेअर करा. यामुळे विश्वासार्हता वाढते, आणि मुलं आपोआप सर्व काही शेअर करु लागतात. पण हे सर्व करत असताना कुठे अंकुश लावायचा याचीदेखील खात्री असू दे. 

8) नियम आखून द्या
घरामध्ये काही नियम आखून द्या आणि त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणीही करा. इंटरनेट कधी वापरावा यासाठी वेळ आखून ठेवा, उदाहरणार्थ रात्री 8 वाजल्यानंतर मोबाईलला हात लावायचा नाही. सोबतच रात्रीच्या जेवणाची वेळही नक्की करा. यावेळी सर्वजण एकत्र असतील याची खात्री करा, आणि जेवताना दिवसभरात काय केलं यावर चर्चा करा. या गोष्टी सहज सोप्या आहेत. 

9) खासगी आयुष्य किती शेअर करायचं हे ठरवा
सोशल मीडियावर खासगी आयुष्य कितपत शेअर करायचं याचेही नियम आखलेत तरी काही हरकत नाही. पण नियम सर्वांसाठीच असले पाहिजेत. जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फोटो शेअर करत असाल, कुठे फिरायला गेल्यानंतर चेक-इन करत असाल तर तुमच्या मुलांना हे करण्यापासून तुम्ही रोखू शकत नाही. तुम्ही कुठे फिरायला जात याची माहिती सतत सोशल मीडियावर अपडेट करणं धोकायदाक असू शकतं, आणि याची काळजी मुलांनाही घ्यायला सांगा. 

खरं तर प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात. प्रत्येक गोष्टीची चांगली आणि वाईट बाजू असते. तसं पाहायला गेलं तर सोशल मीडिया धोकादायक आहे, पण त्याचा फायदाही तितकाच आहे. योग्य वापर केला तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण खूप ज्ञानही कमावू शकतो. पण दिवसाच्या शेवटी आपण काय आणि कशाप्रकारे त्याच्या वापर करतो यावर सर्व अवलंबून असते. 

Web Title: How to help children from getting addicted to social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.