CM योगींचे भाषण ऐकून घाबरला कुख्यात गुंड, न्यायालयासमोर केले आत्मसमर्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 12:50 PM2021-11-12T12:50:11+5:302021-11-12T12:50:15+5:30
''गुन्हेगारांनी स्वेच्छेने तुरुंगात जाण्याचा मार्ग निवडावा किंवा त्यांना मारले जाईल.''
कानपूर:उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(UP CM Yogi Adityanath) यांची राज्यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरुच आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे राज्यातील अनेक कुख्यात गुन्हेगार पोलिसांसमोर स्वेच्छेने आत्मसमर्पण करण्यात स्वतःचे भले मानत आहेत. सोमवारी सीएम योगींनी कैरानामध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना गुन्हेगारांना कठोर शब्दात इशारा दिला होता.
आपल्या भाषणात योगी म्हणाले होते की, 'एकतर गुन्हेगारांनी स्वेच्छेने तुरुंगात जाण्याचा मार्ग निवडावा किंवा त्यांना मारले जाईल.' त्यांच्या या इशाऱ्यानंतर लगेच बुधवारी कैराना येथे जामीन घेण्यास नकार देत कुख्यात गुंड फुरकानने न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. याशिवाय कुख्यात माफिया सुशील मिशी यानेही पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
योगींची भीती, गुडांचे आत्मसमर्पण
सहारनपूर विभागाचे डीआयजी डॉ. प्रीतींदर सिंग यांनी सांगितले की, फुरकान आणि सुशील मिशीने कारवाईच्या भीतीने आत्मसमर्पण केले. त्यांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली असून अन्य बेनामी मालमत्तांची चौकशी सुरू आहे. कुख्यात सुशील मिशी आणि फुरकान यांचा मोठा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. माफियांना आश्रय देणारे आणि त्यांना सहकार्य करणारेही पोलिसांच्या रडारवर आहेत, त्यांचीही ओळख पटवून त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल, असे डीआयजींनी सांगितले.
माफियांमध्ये भीतीचे वातावरण
राज्यात योगी सरकार आल्यापासून सातत्याने माफियांवर कारवाई सुरू आहे. माफियांना अटक करुन त्यांच्या बेकायदेशीर मालमत्तांवर बुलडोझर चालवला जात आहे. याशिवाय, माफियांना एकतर तुरुंगात पाठवले जात आहे किंवा त्यांना चकमकीत मारले जात आहे. त्यामुळे सरकारकडून होत असलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे राज्यातील अनेक गुन्हेगार आत्मसमर्पण करण्यात आपले भले मानत आहेत.