पाटणा, दि. 12 - संयुक्त जनता दलाने शरद यादव यांना राज्यसभेतील नेतेपदावरुन हटवलं आहे. वारंवार पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना राज्यसभेतील नेतेपदावरुन हटवण्यात आले असे जदयूच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. शरद यादव यांनी जी भूमिका घेतली होती त्यामुळे अशा प्रकारची कारवाई आवश्यक होती असे बिहार जदयूचे अध्यक्ष वशिष्ठ नारायण यांनी सांगितले. 

बिहारचे खासदार आरसीपी सिंह शरद यादव यांची जागा घेतील. पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेचे नवनियुक्त सभापती एम.व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन आरसीपी सिंह यांची राज्यसभा नेतेपदी नियुक्ती झाल्याचे पत्र सोपवले. बिहारमध्ये महागठबंधनमधून बाहेर पडून भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याचा नितीश कुमारांचा निर्णय शरद यादव यांना पटला नव्हता. ही आघाडी झाल्यापासून ते विरोध करत होते. गुजरात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्या विजयानंतर शरद यादव यांनी टि्वटकरुन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. वास्तविक जदयूने या निवडणुकीत भाजपाला साथ दिली होती. 

1984 सालच्या उत्तरप्रदेश केडरचे आयएएस अधिकारी असलेले आरसीपी सिंह यांनी 2010 साली सरकारी नोकरीतून निवृत्ती घेतली आणि जदयूमध्ये सहभागी झाले. नितीश कुमारांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे. 2015 बिहार विधानसभा निवडणुकीच्यावेळी महागठबंधनची कल्पना त्यांनीच मांडली होती असे सूत्रांनी सांगितले. 
 
आता कोणालाच घाबरत नाही - शरद यादव
जेडीयूचे वरिष्ठ नेता शरद यादव यांनी आपल्याविरोधात कारवाई करण्याची दिलेली धमकी फेटाळून लावली आहे. बिहारमधील महाआघाडी तोडून भाजपाशी हातमिळवणी केल्याने शरद यादव मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर नाराज आहेत. आपली ही नाराजी त्यांनी उघड केली असून, नितीश कुमार यांच्यावर टीकाही केली आहे. दरम्यान शरद यादव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जेडीयूमधील काही नेते करत असल्याच्या वृत्तावर बोलताना, आपण माजी पंतप्रधान इंदिर गांधींच्या विरोधातही उभे राहिलो होतो, आणि आता कोणालाच घाबरत नाही असं सांगितलं आहे. 

जेडीयूचे संसदीय नेते शरद यादव यांनी सांगितलं की, 'काही नेता मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी इंदिरा गांधींचाही न घाबरता सामना केला आहे. मग मला घाबरवणारे हे कोण ?. नितीश कुमार यांच्या निर्णयाविरोधात आपली नाराजी आणि विरोध लोकांसमोर मांडण्यासाठी शरद यादव यांनी राज्यात संवाद यात्रा काढली असून लोकांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.