हत्याकांडाने दिल्ली हादरली, एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 13:04 IST2017-10-07T12:28:34+5:302017-10-07T13:04:05+5:30
राजधानी दिल्लीत एकाच घरात पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. उत्तरपूर्व दिल्लीमधील मानसरोवर पार्क येथे हा हत्याकांड झाला आहे.

हत्याकांडाने दिल्ली हादरली, एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत एकाच घरातील पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. उत्तरपूर्व दिल्लीमधील मानसरोवर पार्क येथे हा हत्याकांड झाला आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. एकाच घरातील पाच जणांची हत्या झाल्याने राजधानी हादरली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु आहे.
हत्या झालेल्यांमधील चौघेजण एकाच कुटुंबातील आहेत, तर एका सुरक्षारक्षकाचा समावेश आहे. सर्व मृतदेहांची ओळखदेखील पटली आहे. नुपूर जिंदाल (35), अंजली जिंदाल (33), उर्मिला (65) आणि संगीत गुप्ता (43) हे सर्वजण एकाच कुटुंबातील असून याशिवाय सुरक्षारक्षक राकेश (50) यांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना सकाळी 7.30 वाजता फोनवरुन हत्येची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. हत्या करण्यात आलेल्या कुटुंबाचा त्याच परिसरात तेलाचा व्यवसाय आहे.
Delhi: 5 people, including 3 women, found dead in Shahdara's Mansarovar Park. More details awaited.
— ANI (@ANI) October 7, 2017
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतदेहांवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आहेत. सहपोलीस आयुक्त रवींद्र यादव यांनी घटनेला दुजोरा दिला असून तपासासाठी पोलिसांची पाच पथकं तयार करण्यात आल्याचं सांगितलं आहे.
पोलिसांनी इतर नातेवाईकांची चौकशी सुरु केली असून, हत्येमागे नेमकं कोणतं कारण होतं याचा शोध घेत आहेत. दरम्यान संपत्तीच्या वादावरुन हा हत्याकांड झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पोलिसांनी आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली असून, फिंगरप्रिंट घेतले आहेत. हत्येचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. लवकराच लवकरत आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.