2019 मध्ये काँग्रेसची खरी ताकद दिसेल- राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 03:50 PM2018-04-29T15:50:39+5:302018-04-29T15:50:39+5:30

पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींची चौफेर टीका

Congress will win every election from now emerge victorious in 2019 says Rahul Gandhi attacks pm narendra modi | 2019 मध्ये काँग्रेसची खरी ताकद दिसेल- राहुल गांधी 

2019 मध्ये काँग्रेसची खरी ताकद दिसेल- राहुल गांधी 

Next

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौफेर टीका केलीय. डोकलाम, शेतकऱ्यांचं कर्ज, भ्रष्टाचार, न्यायालयातील 4 न्यायाधीशांनी घेतलेली पत्रकार परिषद या मुद्यांवरुन राहुल गांधींनी मोदींवर शरसंधान साधलं. सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेऊन न्याय मागावा लागतो. मात्र तरीही मोदी मूग मिळून गप्प बसतात, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींवर टीका केली. 

राहुल गांधींनी मोदींवर सडकून टीका करत 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीचं बिगुल फुंकलं. भ्रष्टाचार, महिलांची सुरक्षा, बँक घोटाळे, राफेल करार यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोदी शांत का बसतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश रॅलीला ते संबोधित करत होते. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून ही राहुल यांची दिल्लीतील पहिलीच रॅली होती. कर्नाटकची निवडणूक जवळ आली असताना राहुल गांधींनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 'आतापासून येणाऱ्या सर्व निवडणुका काँग्रेस जिंकेल आणि 2019 मध्ये ताकद दाखवून देईल,' असं राहुल यांनी म्हटलं. 

'न्यायालयं, निवडणूक आयोगापासून आयआयटी, आयआयएमसारख्या संस्थांमध्ये संघाची माणसं आणून बसवली जाताहेत. मोदींनी 2014 च्या निवडणुकीवेळी प्रचार करताना 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र 4 वर्षांमधील बेरोजगारीचं प्रमाण गेल्या 8 वर्षांमधील सर्वात वाईट स्थितीत आहे,' असं म्हणत राहुल गांधींनी रोजगाराच्या मुद्यावरुन मोदी सरकारवर तोफ डागली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा जीएसटीचा उल्लेख गब्बर सिंह टॅक्स असा केला. 'जीएसटीमुळे असंघटित क्षेत्र उद्ध्वस्त केलं. चीनमध्ये दर 24 तासांमध्ये 50 हजार रोजगार निर्माण होतात. मात्र भारतात 24 तासांमध्ये रोजगाराच्या केवळ 450 संधी तयार होतात,' असंही राहुल यांनी म्हटलं.
 

Web Title: Congress will win every election from now emerge victorious in 2019 says Rahul Gandhi attacks pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.