"देशाच्या फाळणीला काँग्रेस आणि त्यावेळचे नेतेच जबाबदार"; असदुद्दीन ओवेसींचा जोरदार निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 01:20 PM2021-11-12T13:20:24+5:302021-11-12T13:21:13+5:30
Asaduddin Owaisi And Congress : एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी "देशाच्या फाळणीला काँग्रेस आणि त्यावेळचे नेतेच जबाबदार" असल्याचं म्हटलं आहे.
नवी दिल्ली - अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा मित्रपक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश राजभर (Omprakash Rajbhar) यांनी जिनांबाबत केलेल्या एका विधानामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे. जर मोहम्मद अली जिना यांना देशाचे पहिले पंतप्रधान बनवले असते तर देशाची फाळणी झाली नसती, असा दावा ओमप्रकाश राजभर यांनी केला आहे. यानंतर आता यावरूनच एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी "देशाच्या फाळणीला काँग्रेस आणि त्यावेळचे नेतेच जबाबदार" असल्याचं म्हटलं आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं. त्यामध्ये त्यांनी "मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), भारतीय जनता पार्टी (BJP) आणि समाजवादी पार्टी यांचे जे लोक इतिहास वाचत नाही, त्यांना आव्हान देतो. फाळणी मुस्लिमांमुळे किंवा जिना यांच्यामुळे झाली नाही. त्यावेळी फक्त तेच मुस्लिम मतदान करू शकत होते जे नवाब किंवा पदवीधारकांसारखे प्रभावशाली होते. काँग्रेस आणि त्यावेळचे नेतेच फाळणीसाठी जबाबदार होते" असं म्हटलं आहे. ओपी राजभर यांनी बुधवारी वाराणसीमध्ये मोहम्मद अली जिना यांना भारताचे पहिले पंतप्रधान केले असते तर देशाची फाळणी झाली नसती, असे विधान केल्यानंतर ओवेसी यांनी आता हे विधान केलं आहे.
"उत्तर प्रदेश पोलिसांना तपास करणं माहीत नाही पण हत्या करणं माहितीय"
ओवेसी यांनी कासगंज घटनेत तरुणाच्या मृत्यूबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांवर जोरदार निशाणा साधला आहे. "कासगंजची घटना तुमच्यासमोर आहे. अल्ताफच्या वडिलांना सांगण्यात आले की त्यांच्या मुलाने हुडीच्या तारने अडीच फूट उंच पाण्याच्या नळाला गळफास लावून आत्महत्या केली. परंतु कासगंज पोलिसांनीच त्या तरुणाची हत्या केली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना तपास करणे माहीत नाही पण हत्या करणं माहीत आहे" असं असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मोहम्मद अली जिना यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे वाद
अखिलेश यादव यांनी एका सभेत मोहम्मद अली जिना यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे वाद झाला होता. त्याबाबत ओमप्रकाश राजभर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, जर जिना यांना देशाचे पहिले पंतप्रधान बनवले असते तर देशाची फाळणी झाली नसती. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनीही जिनांचे कौतुक केले होते, त्यामुळे त्यांचेही विचार वाचा, असा सल्ला राजभर दिला. याबाबत विचारलेल्या प्रश्नामुळे ओमप्रकाश राजभर संतापले, ते म्हणाले की, "जिनांशिवाय तुम्ही महागाईवर प्रश्न का विचारत नाही. हे सर्व काही भाजपामुळे होत आहे. भारतीय जनता पक्षामधून हिंदू-मुस्लिम आणि भारत-पाकिस्तान हटवा, म्हणजे यांची बोलती बंद होईल."