लोकसभेच्या मैदानात भाजपा खेळणार टी-२०, कॉँग्रेसचीही देशातील प्रत्येक बूथवर फिल्डिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 01:27 AM2018-09-17T01:27:36+5:302018-09-17T06:46:12+5:30

निवडणुकीसाठी तयारी सुरू; दोन्ही प्रमुख पक्षांनी आखली ‘बूथ’ रणनीती!

BJP will play T20 in Loksabha field, field of Congress in every booth in the country! | लोकसभेच्या मैदानात भाजपा खेळणार टी-२०, कॉँग्रेसचीही देशातील प्रत्येक बूथवर फिल्डिंग!

लोकसभेच्या मैदानात भाजपा खेळणार टी-२०, कॉँग्रेसचीही देशातील प्रत्येक बूथवर फिल्डिंग!

Next

नवी दिल्ली : लोकसभेच्या रणांगणासाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी असून, रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. येत्या निवडणुकीत भाजपा ‘टी-२०’ फॉर्म्युला घेऊन मैदानात उतरणार आहे, तर काँग्रेस देशभरातील प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांची फील्डिंग लावणार आहे.
भाजपाच्या या नितीचे नाव जरी ‘टी-२०’ असले तरी क्रिकेटमधील सामन्याहून त्याचे स्वरूप वेगळे असेल. त्यात पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यास चहापानासाठी किमान २० घरांना भेट देऊन नरेंद्र मोदी सरकारची भरीव कामगिरी मतदारांच्या मनावर बिंबविण्याचे लक्ष्य देण्यात येणार आहे.

पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, अलिकडेच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाची निवडणूक व्यूहरचना ठरविण्यात आली. त्यात पक्ष कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे, हा सर्वात महत्वाचा भाग असेल. त्यासाठी ‘हर बूथ, दस यूथ’ असे सूत्र ठरविण्यात आले आहे. बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांखेरीज पक्षाचे सर्व आमदार व खासदारही सरकारची यशोगाथा तळागळापर्यंत पोहोचविण्यात सक्रियतेने सहभागी होतील.

येत्या काही महिन्यांत होणाऱ्या चार राज्य विधानसभांच्या व त्यानंतर पुढील वर्षी होणारी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक डोळ््यापुढे ठेवून काँग्रेसने देशभरात एक कोटी ‘बूथ सहाय्यक’ नेमून प्रत्येक मतदार कुटुंबाशी संपर्क साधण्याची महत्वाकांक्षी योजना आखली आहे.
६ सप्टेंबर रोजी पक्षाचे सरचिटणीस अशोक गेहलोत व खजिनदार अहमद पटेल यांनी सर्व प्रदेश काँग्रेस प्रमुखांची दिल्लीत बैठक घेतली त्यावेळी ही योजना ठरली. त्यावेळी पक्षाध्यक्ष राहुल गांधी मानसरोवरच्या यात्रेला गेले होते. तेथून परत आल्यावर गांधी यांनी यास मंजुरी दिल्यानंतर गेहलोत यांनी सर्व प्रदेश पक्षांना १३ सप्टेंबर रोजी पत्र पाठवून हा निर्णय कळविला आहे.

भाजपा काय करणार?
जास्तीत जास्त लोकांना ‘नरेंद्र मोदी अ‍ॅप’शी जोडून घेण्यात येईल. प्रत्येक बूथवर किमान १०० नव्या लोकांना या ‘अ‍ॅप’शी जोडण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
कार्यकर्त्यांना अधिक प्रभावी जनसंपर्क करता यावा यासाठी
‘नरेंद्र मोदी अ‍ॅप’मध्ये एक नवा विभाग जोडण्यात येईल. यात प्रत्येक कार्यकर्त्यास त्याला नेमून दिलेले नेमके काम तर कळेलच त्याखेरीज आकर्षक ग्राफिक व व्हिडिओ क्लिपद्वारे उपलब्ध करून दिली जाईल.
‘घर घर दस्तक’ नावाची मोहीम निवडणुकीचा प्रत्यक्ष प्रचार सुरु होण्याच्या आधीपासून हाती घेतली जाईल. यासाठी प्रत्येक
बूथवर दोन डझन कार्यकर्त्यांची टोळी नेमली जाईल.

काँग्रेस काय करणार?
पक्षाच्या ब्लॉक व जिल्हा शाखांना मदत करण्यासाठी प्रदेश पक्षांनी प्रत्येक बूथसाठी किमान १० सहाय्यक नेमावेत, असे त्यांना कळविण्यात आले आहे.
पक्षाचे राष्ट्रीय संघटन सचिव जे. डी. सलीम यांनी सांगितले की, सुमारे एक लाख बूथ असतात. प्रत्येक बूथसाठी किमान दहा याप्रमाणे एकूण एक कोटी बूथ सहाय्यक नेमण्याचे पक्षाचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक बूथ सहाय्यकावर त्या भागातील किमान १०-१२ मतदार कुटुंबांशी संपर्क साधण्याची जबाबदारी असेल.
बूथ सहाय्यक नेमण्याचे हे काम राज्य विधानसभा निवडणुकांपूर्वी म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा असल्याचेही सलीम म्हणाले.

Web Title: BJP will play T20 in Loksabha field, field of Congress in every booth in the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.