पंतप्रधान मोदींच्या मित्राचा काँग्रेसला 'हात'? भाजपाची बिकट वाट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 12:35 PM2018-12-20T12:35:16+5:302018-12-20T12:40:23+5:30

महाआघाडीच्या हालचालींना वेग आल्यानं भाजपाची चिंता वाढणार

Announcement Of Rlsp Chief Upendra Kushwaha Joining The Mahagathbandhan Likely To Be happen soon | पंतप्रधान मोदींच्या मित्राचा काँग्रेसला 'हात'? भाजपाची बिकट वाट

पंतप्रधान मोदींच्या मित्राचा काँग्रेसला 'हात'? भाजपाची बिकट वाट

googlenewsNext

पाटणा: लोकसभा निवडणुकीपूर्वी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन एनडीएमधून बाहेर पडणारे राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा भाजपाला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. भाजपाची साथ सोडणारे कुशवाहा लवकरच काँग्रेसचा 'हात' धरू शकतात. आज संध्याकाळपर्यंत बिहारमध्ये 'महाआघाडी'ची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिहारमध्ये भाजपाची वाट बिकट होऊ शकते. 

आज संध्याकाळी राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी, राष्ट्रीय लोक समता पार्टीचे उपेंद्र कुशवाहा यांच्यात बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला आव्हान देण्यासाठी बिहारमधील पक्ष एकत्र येत आहेत. काँग्रेसकडून तीन राज्यांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानं भाजपा नेतृत्त्व चिंतेत असताना बिहारमधील राजकीय घडामोडींमुळे या अडचणींमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये महाआघाडी झाल्यास त्याचा मोठा फटका भाजपाला बसू शकतो. 

महाआघाडी संदर्भात राष्ट्रीय जनता दल, हिंदुस्तानी अवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक समता पार्टीशी चर्चा सुरू असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. राष्ट्रीय जनता दलाच्या तेजस्वी यादव यांनी अनेकदा महाआघाडीवर भाष्य केलं आहे. सोमवारी तीन राज्यांमध्ये काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या सर्व कार्यक्रमांना तेजस्वी उपस्थित होते. एकीकडे मोदींचे मित्र कुशवाहा काँग्रेसच्या गोटात जाण्याची तयारी करत असताना लोक जनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान यांनीदेखील भाजपावर दबाव वाढवला आहे. काही दिवसांपूर्वीच पासवान यांचे पुत्र चिराग यांनी राहुल यांचं कौतुक केलं होतं. त्यामुळे भाजपाच्या चिंतेत भर पडली आहे. 

बिहारमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच निश्चित होऊ शकतो. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. महाआघाडीत कुशवाहा यांचा प्रवेश झाल्यास त्यांच्या राष्ट्रीय लोक समता पार्टीला 4-5 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 8-12, राष्ट्रीय जनता दलाला 18 ते 20, हिंदुस्तानी अवाम मोर्चाला 1-2 आणि सीपीएम-सीपीआयला प्रत्येकी 1 जागा मिळू शकते. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि मित्र पक्षांनी बिहारमध्ये 40 पैकी 31 जागा जिंकल्या होत्या. 
 

Web Title: Announcement Of Rlsp Chief Upendra Kushwaha Joining The Mahagathbandhan Likely To Be happen soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.