नकुशी होतेय हवीशी; मुलांपेक्षा मुलींना दत्तक घेण्याचं प्रमाण वाढलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 01:40 PM2019-02-12T13:40:21+5:302019-02-12T13:41:06+5:30

गेल्या तीन वर्षात दत्तक घेण्यात आलेल्या बालकांमध्ये 60% मुली

60 percent children adopted in India between 2015 and 2018 are girls | नकुशी होतेय हवीशी; मुलांपेक्षा मुलींना दत्तक घेण्याचं प्रमाण वाढलं!

नकुशी होतेय हवीशी; मुलांपेक्षा मुलींना दत्तक घेण्याचं प्रमाण वाढलं!

googlenewsNext

नवी दिल्ली: देशात लिंग गुणोत्तराचं प्रमाण फारसं चांगलं नसताना, स्त्री भ्रूण हत्येची समस्या कायम असताना मुलींबद्दल समाजाचा दृष्टीकोन बदलत असल्याचा एक आशेचा किरण दिसून आला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींना दत्तक घेण्याचं प्रमाण जास्त असल्याची आकडेवारी समोर आली आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली. त्यामुळे मुलींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलत असल्याचं अधोरेखित झालं आहे. विशेष म्हणजे देशात आणि देशाच्या बाहेरुन अशा दोन्ही प्रकारांचा विचार केल्यास, मुलींना दत्तक घेण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. 

गेल्या तीन वर्षांमधील देशातील दत्तक मुलांची आकडेवारी पाहिल्यास नकुशी हवीहवीशी झाल्याचं दिसून येतं. गेल्या तीन वर्षांमध्ये देशात 11,649 मुलं दत्तक घेण्यात आली. यातील मुलींची संख्या 6,962 होती. तर मुलांचं प्रमाण 4,687 इतकं होतं. 2015-16 मध्ये देशात एकूण 3,011 मुलं दत्तक घेतली गेली. यात मुलींची संख्या 1,855 होती. 2016-17 मध्ये 3,210 मुलं दत्तक घेतली गेली. त्यात मुलींचं प्रमाण 1,915 इतकं होतं. 2017-18 मध्ये 3,276 मुलं दत्तक घेण्यात आली. त्यात मुलींची संख्या 1943 होती. तर 2018-19 (डिसेंबर 2018 पर्यंत) देशात 2,152 मुलं दत्तक घेण्यात आली. यापैकी 1249 मुली होत्या. 

गेल्या तीन वर्षांचा विचार करता, दत्तक घेण्यात आलेल्या एकूण बालकांमध्ये मुलींचं प्रमाण जवळपास 60 टक्के आहे. याशिवाय देशाच्या बाहेरुनही मुली दत्तक घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये 2,310 मुलं दत्तक घेण्यात आली. यातील 1,549 मुली होत्या. म्हणजेच देशाच्या बाहेरुन मुली दत्तक घेण्याचं प्रमाण 69 टक्के इतकं आहे. महिला आणि बाल कल्याण मंत्रालयानं लोकसभेत ही आकडेवारी मांडली. लोकसभा सदस्य तेज प्रताप यादव, एल. आर. शिवरामे गौडा आणि अंजू बाला यांनी विचारलेल्या प्रश्नांनंतर ही आकडेवारी मंत्रालयाकडून सादर करण्यात आली. 
 

Web Title: 60 percent children adopted in India between 2015 and 2018 are girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.