तेलंगणामधील ३५ नेते काँग्रेसमध्ये, खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 07:18 AM2023-06-27T07:18:32+5:302023-06-27T07:18:53+5:30
Congress: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत असताना सोमवारी तेलंगणामधील त्यांच्याच पक्षाच्या ३५ नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
- सुनील चावके
नवी दिल्ली : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत असताना सोमवारी तेलंगणामधील त्यांच्याच पक्षाच्या ३५ नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
के. चंद्रशेखर राव यांच्या मंत्रिमंडळात चार वर्षे मंत्री असलेले पाच वेळचे आमदार जुपाली कृष्ण राव, माजी खासदार पी. श्रीनिवास रेड्डी, विधान परिषदेचे सदस्य दामोदर रेड्डी, माजी आमदार गुरुनाथ रेड्डी यांच्यासह पाच माजी आमदार आणि इतर २० महत्त्वाच्या नेत्यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. वेणुगोपाल, तेलंगणाचे काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे आणि प्रदेशाध्यक्ष खा. रेवंत रेड्डी उपस्थित होते. काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यापूर्वी या नेत्यांनी खरगे, राहुल गांधी यांच्यासह इतर ज्येष्ठ नेत्यांची काँग्रेस मुख्यालयात भेट घेतली.