तामसवाडी येथे बिबट्याचा धुमाकूळ
By admin | Published: October 1, 2016 12:31 AM2016-10-01T00:31:31+5:302016-10-01T00:31:59+5:30
हल्ल्यात दोन शेळ्या ठार, तीन जखमी
निफाड : तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून, गुरुवारी रात्री बिबट्याने तामसवाडी येथे पाच शेतकऱ्यांच्या शेळ्यांवर हल्ला करून २ शेळ्या ठार केल्या, तर तीन जखमी झाल्याची घटना घडली.
गुरुवारी रात्री तामसवाडी येथे शेतवस्तीत राहणारे भगवान निवृत्ती आरोटे यांच्या चाळीजवळ बांधलेल्या एका शेळीवर बिबट्याने हल्ला केला. शेळ्यांच्या आरडाओरडीने आरोटे कुटुंबीय मदतीसाठी धावल्याने बिबट्या तेथून पसार झाला. या हल्ल्यात शेळी जखमी झाली आहे. त्यानंतर बिबट्याने १ किमी अंतरावर असलेल्या हरी किसन कांदे यांच्या वस्तीवर मोर्चा वळवला. त्यांच्या घराबाहेर बांधलेल्या २ पैकी एका शेळीवर हल्ला करून तिला ठार केले. तर शेजारील शेतकऱ्याच्या घराबाहेर बांधलेल्या शेळीवर हल्ला करून तिला जखमी केले. त्यानंतर १ किमी अंतरावर असलेल्या सुदाम भगवंत शिंदे यांच्या घराबाहेर बांधलेली शेळी ठार केली. याच वस्तीपासून काही अंतरावर असलेल्या गुलाब जगन्नाथ शिंदे यांच्या शेतातील घराबाहेर बांधलेल्या शेळीवर हल्ला करून तिला जखमी केले. सदरच्या घटना येवला वनविभागाला कळवण्यात आल्यानंतर वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक दिलीप अहिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व घटनांचा पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (वार्ताहर)