आजपासून पितृपक्ष
By Admin | Updated: September 17, 2016 00:43 IST2016-09-17T00:43:24+5:302016-09-17T00:43:40+5:30
आजपासून पितृपक्ष

आजपासून पितृपक्ष
नाशिक : भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून शनिवारी (दि. १७) महालयारंभ पर्वास सुरुवात होत असून या महालयारंभाची सांगता कार्तिक वद्य प्रतिपदेस मंगळवार, दि. १५ नोव्हेंबरला होणार आहे. या महालयारंभ पर्व अंतर्गत पितृपक्षासदेखील शनिवारी (दि. १७) सुरुवात होत असून शुक्रवारी (दि. ३०) सर्वपित्री अमावास्या अर्थात भाद्रपद वद्य अमावास्येने या पितृपक्षाची सांगता होणार आहे.
गुरुवारी (दि. १५) गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिल्यानंतर शुक्रवारी (दि. १६) पितृपक्षास प्रारंभ झाला आहे. श्राद्ध कर्माच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांचे स्मरण करत कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्राद्ध करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत बघायला मिळते. पितरांचे स्मरण करून श्राद्ध विधी करण्याबरोबरच तर्पणविधी, पिंडदान विधीदेखील करण्यात येतात. पितृपक्षातील १५ दिवसांमध्ये ज्यांना श्राद्धविधी करणे शक्य झाले नाही त्यांना कार्तिक वद्य प्रतिपदेपर्यंत (दि. १५ नोव्हेंबर) श्राद्ध विधी करता येईल असे शास्त्र अभ्यासक रत्नाकर संत यांनी सांगितले. या पितृपक्षाअंतर्गत मंगळवारी (दि. २०) भरणी श्राद्ध, शुक्रवारी (दि. २३) अष्टमी श्राद्ध, मंगळवारी (दि. २७) द्वादशी श्राद्ध, तर शुक्रवारी (दि. ३०) सर्वपित्री अमावास्या या मुख्य तिथी असून ज्या पूर्वजांचे पौर्णिमेला निधन झाले त्यांच्यासाठी या दिवशी श्राद्धविधी करता येणार असल्याचे दाते पंचागात देखील सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)