लॉकडाउनच्या काळात मिळाले हजारो मजुरांना काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 01:27 AM2020-05-03T01:27:43+5:302020-05-03T01:28:03+5:30
नाशिक : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी सुरू असल्याने ग्रामीण भागातील मजुरांची उपासमार टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेचे कामे सुरू केली असून, त्यामुळे मजुरांच्या हाताला काम तर मिळालेच, परंतु त्यांना मान्सूनपूर्व हंगामात स्वत:च्या शेतात शेतीकामे करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
नाशिक : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी सुरू असल्याने ग्रामीण भागातील मजुरांची उपासमार टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेचे कामे सुरू केली असून, त्यामुळे मजुरांच्या हाताला काम तर मिळालेच, परंतु त्यांना मान्सूनपूर्व हंगामात स्वत:च्या शेतात शेतीकामे करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. लॉकडाउनच्या काळात गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुमारे अडीच हजार कामे सुरू करून साडेअकरा हजारांहून अधिक मजुरांना यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.
ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून शहरी भागात रोजगारासाठी स्थलांतरित केलेल्या मजुरांची संख्या हजारोच्या आसपास असून, आजवर या मजुरांनी शहरातील बांधकाम क्षेत्रात कामे करून आपला उदरनिर्वाह केला. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउन व संचारबंदी जारी केल्याने शहरी भागात वास्तव्यास असलेल्या ग्रामीण भागातील मजुरांवर उपासमारीची वेळ आली त्यामुळे त्यांनी पुन्हा आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला. परंतु गावी जाऊनही त्यांच्या हाताला काम मिळण्याची शाश्वती राहिलेली नाही. मुळात लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला पाहिजे त्याप्रमाणात भाव मिळत नाही, त्याचबरोबर मजुरांना रोजगार देण्यासाठीही पैसे नसल्याने शेतकऱ्यांनी शेतातील उभी पिकांमध्ये जनावरे सोडून दिली आहेत. अशा परिस्थितीत गावाकडे पोट भरण्यासाठी गेलेल्या मजुरांवर दुहेरी संकट कोसळले असल्याचे पाहून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेंतर्गत अशा मजुरांना त्यांच्या गावातच हाताला काम देण्याची योजना आखली आहे. या संदर्भात सर्वच ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या असून, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सार्वजनिक विकास कामे सुरू करण्याबाबत घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी अशा मजुरांना त्यांच्या शेतातच किंबहुना अन्य शेतकºयांकडे रोहयोंतर्गत शेतीचे कामे करण्याची मुभा देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ६७९ ग्रामपंचायतींनी याकामी पुढाकार घेतला असून, गेल्या पंधरा दिवसांत रोजगार हमी योजनेची २,४८९ कामे सुरू करण्यात आली आहे. या कामांवर जवळपास साडेअकरा हजार मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. येत्या आठवड्यात मजुरांची ही संख्या पंधरा हजारांहून अधिक होण्याची शक्यता लिना बनसोड यांनी बोलून दाखविली आहे. वाढलेले लॉकडाउन व मजुरांची उपासमार टाळण्यासाठी जिल्ह्यात ६२ हजार कामे सेल्फवर ठेवण्यात आले आहेत.