शिवाजीनगर विकासापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 11:42 AM2018-05-31T11:42:03+5:302018-05-31T11:42:03+5:30
गंगापूर/नाशिक : त्र्यंबक नाशिक तालुक्याच्या हद्दीवर वसलेल्या शिवाजीनगर ग्रामपंचायत व कावळ्याची वाडी येथील ग्रामपंचायत विकासापासून कोसो दूर असून, आमदार व खासदारांच्या आश्वासनावर गेल्या चार वर्षांपासून फक्त वाट बघण्यापलीकडे काहीही झाले नसल्याचे येथील सरपंच राजू बेंडकोळी यांनी सांगितले.
डोंगराळ व अतिशय दुर्गम भाग असल्याने या ठिकाणी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अधिकारी फिरकत नसल्याने या गावातील नागरिकांच्या समस्या सोडवायच्या तरी कोणी? असा प्रश्न पडलेला आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, पेंशन योजना, निराधार योजना तसेच गावातील अंगणवाडीमधील मुलांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आदि विविध प्रश्न भेडसावत आहेत. लहान मुले आहारापासून वंचित राहत असल्याचे सरपंच राजू बेंडकोळी यांनी सांगितले. गावामध्ये रु ग्णवाहिका नसल्याने नागरिकांना रात्री अपरात्री काही दुखापत झाल्यास त्याला रु ग्णालयापर्यंत घेऊन जाण्यासाठी पंचायतीजवळ तसेच गावात कोणत्याही प्रकारचे साधन नसल्याने परवड होते. गावात पंचायतीला स्वत:ची हक्काची एकही इमारत नाही, गावात पिण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, महिलांना रोज उठून लांब अंतरावरून डोक्यावर पाणी आणावे लागते. यावेळी सरपंचासोबत आलेल्या इतर ग्रामस्थांनीही गावातली समस्येचा पाढा वाचला, गरोदर माता बालकांचा पोषण आहार तोही थोड्या दिवसांपुरता मिळतो आणि नंतर बंद होतो. नियमित आहार मिळत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. गावातील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे, गावातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे.