नाशिकच्या शंभर फुटी रस्त्यावर वाढले अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:41 PM2018-02-12T12:41:34+5:302018-02-12T12:42:32+5:30
वडाळागावातून जाणाºया शंभर फुटी रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या अनधिकृत झोपड्यांमुळे रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम रखडले
नाशिक : राजीवनगर झोपडपट्टीलगत शंभर फुटी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पदपथावर अतिक्रमण वाढले असून त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या अतिक्रमणातून हा रस्ता मोकळा श्वास घेणार? की ‘सदर पदपथ अनधिकृत झोपड्या आणि टपºयासाठी असून, पादचाºयांसाठी नाही’ असा फलक तरी लावा, अशी उपरोधिक मागणी नागरिकांनी केली आहे.
मुंबई-आग्रा महामार्ग व पुणे महामार्गास ये-जा करण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून सुमारे १० वर्षांपूर्वी राजीवनगर झोपडपट्टी, कलानगर, राजसारथी सोसायटी, वडाळागाव, डीजीपीनगर क्रमांक एक या मार्गे शंभर फुटी डीपी रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यालगत असलेली विविध उपनगरे आणि मुंबई व पुणे महामार्गास ये-जा करण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. वडाळागावातून जाणाºया शंभर फुटी रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या अनधिकृत झोपड्यांमुळे रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम रखडले होते. सुमारे एक महिन्यापूर्वी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून सुमारे चारशे अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करून रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु राजीवनगर झोपडपट्टी एका खासगी जागेत असल्याने त्या ठिकाणी सुमारे १००० झोपड्या आहेत. तेथे झोपड्या उभारण्यास जागा नसल्याने सुमारे दहा वर्षांपासून झोपडपट्टीलगत असलेल्या दुतर्फा पदपथावर अनेक अनधिकृत झोपड्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पादचाºयांना पदपथाअभावी रस्त्यावर जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे लहान-मोठे अपघातही अनेक वेळेस घडतात. मनपा प्रशासनाकडे अनेक वेळेस तक्रार करूनही अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे सदर पदपथ पादचाºयांसाठी की अनधिकृत झोपडीधारकांसाठी आहे, असा उपरोधिक प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे.