गेन बिटकॉईनच्या अमित भारद्वाजला सात दिवसांची कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 17:02 IST2018-05-10T17:02:22+5:302018-05-10T17:02:22+5:30
गेन बिटकॉईनच्या माध्यमातून नांदेडकरांना जवळपास 100 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या अमित भारद्वाज यांच्यासह महाराष्ट्रातील एजंट हेमंत सूर्यवंशी या दोघांना नांदेड न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गेन बिटकॉईनच्या अमित भारद्वाजला सात दिवसांची कोठडी
नांदेड : गेन बिटकॉईनच्या माध्यमातून नांदेडकरांना जवळपास 100 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या अमित भारद्वाज यांच्यासह महाराष्ट्रातील एजंट हेमंत सूर्यवंशी या दोघांना नांदेड न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांकडून बुधवारी या दोघांना नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
व्हर्चुअल करन्सी म्हणजेच अदृश्य चलनाच्या मायाजालात देशभरातील अनेक जण अडकले आहेत. नांदेड मध्येच शिक्षण घेतलेल्या अमित भारद्वाज याने स्वतःची गेन बिटकॉईन ही कंपनी स्थापन केली होती. आपल्या ओळखीचा फायदा घेत त्याने नांदेडमध्ये अनेक जणांकडील बिटकॉईन घेतले. त्याबदल्यात आकर्षक व्याज देण्याचे आमिष त्याने दिले होते. अशाप्रकारे नांदेड मधून त्याने तब्बल १७५ बिटकॉईन गोळा केले होते. सुरवातीला काही जणांना परतावाही दिला. परंतु, त्यानंतर त्याने परतावा देण्याच्या बदल्यात बाजारात अतिशय कमी मूल्य असलेले एम कॅप हे चलन गुतवणूकदारांना दिले.
त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर एका प्राध्यापकाने या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणात तक्रारींचा ओघ वाढतच गेला. नांदेड मध्ये आतापर्यंत अमित भारद्वाज याने ५ लाख रुपये किमतीचे तब्बल १७५ बिटकॉईन गुंतवणूकदरकडून घेतले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी भारद्वाज याला दिल्ली विमानतळावर पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी भारद्वाज याच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले.
याप्रकरणी नांदेड पोलिसांनी त्याचा ताबा मागितला होता. बुधवारी अमित भारद्वाज व हेमंत सूर्यवंशी यांचा ताबा मिळाल्यानंतर या दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते . न्या एस एस तोडकर यांनी दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.