जि.प.ला हवी मुक्तता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:03 AM2017-10-24T00:03:01+5:302017-10-24T00:03:27+5:30
नगर परिषद, नगर पंचायत या स्वतंत्र यंत्रणा आहेत. महापालिका, जिल्हा परिषदसारखीच त्यांची कार्यपद्धती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नगर परिषद, नगर पंचायत या स्वतंत्र यंत्रणा आहेत. महापालिका, जिल्हा परिषदसारखीच त्यांची कार्यपद्धती आहे. असे असतानाही या दोन्ही संस्थाच्या कार्यक्षेत्रांमध्ये काही घटना घडल्यास, जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांना धावून जावे लागले. त्याचा परिणाम जि.प.च्या कामकाजावर होतो. त्यामुळे नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील जबाबदारीतून जिल्हा परिषदेला मुक्त करावे, अशी मागणी जि.प.च्या आरोग्य समितीने केली आहे. यासंदर्भात लवकरच शासनाला प्रस्तावसुद्धा पाठविण्यात येणार आहे.
वाडीमध्ये डेंग्यूचा उद्रेक झाल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. तर शेकडोंना लागण झाली होती. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे ५४ अधिकारी, कर्मचारी येथे कामाला लागले होते. वाडी ही नगर परिषद झाल्याने वाडीचा जि.प. शी सबंध राहिला नाही. असे असतानाही जि.प.च्या आरोग्य विभागाने अख्खी यंत्रणा कामाला लावली. मात्र वाडी नगर परिषदेकडून कुठलेही सहकार्य मिळाले नाही, अशी खंत आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी जि.प.च्या आरोग्य समितीच्या बैठकीत व्यक्त केली. यापूर्वीही नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात अशा घटना घडल्यावर, नगर परिषदेकडून कुठलेही सहकार्य मिळत नाही, असे मतही आरोग्य अधिकाºयांनी व्यक्त केले. त्यामुळे नगर परिषद, नगरपंचायत ही यंत्रणा जिल्हा परिषदेतून वगळावी, अशा मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने शासनाकडे पाठवावा, अशा सूचना जि.प.च्या आरोग्य समितीचे सभापती व उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी अधिकाºयांना दिल्या.
नगर परिषद, नगर पंचायत यांना कराच्या रूपात महसूल मिळतो. त्यामुळे त्या महसुलाचा वापर करून आपली यंत्रणा सक्षम करावी, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा परिषदेवर निर्भर राहण्याची वेळ येणार नाही. परंतु नगर परिषद, नगर पंचायत याकडे दुर्लक्ष करून, सर्वस्वी जि.प. वर अवलंबून राहते. जिल्ह्यातील मोहपा, खापा, मोवाड, कन्हान पिपरी, मौदा या नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये जि.प.चे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तर वाडी नगर परिषद व महादुला नगर पंचायतमध्ये जि.प.चे उपकेंद्र आहे. या केंद्रावरही यंत्रणा कुठलाही खर्च करीत नाही. नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील जनता याचा उपयोग करीत असल्यामुळे नगर परिषदेने स्वतंत्र यंत्रणा उभारणे गरजेचे आहे परंतु तसे होत नाही. त्याचा भुर्दंड जि.प. ला बसतो आहे.
आम्ही इमारती द्यायला तयार आहोत
नगरपरिषद व नगरपंचायतीच्या अंतर्गत आमचे दवाखाने आहे. त्या दवाखान्याच्या इमारती आम्ही या संस्थेला हस्तांतरित करायला तयार आहो. आम्ही ते आरोग्य केंद्र जि.प. क्षेत्रात स्थानांतरित करू. आजच्या घडीला जि.प.च्या आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता आहे. जि.प.चा व्याप मोठा असल्याने, नगरपरिषदेला आम्ही सेवा पुरवूच शकत नाही. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी.
- शरद डोणेकर, सभापती, आरोग्य समिती, जि.प.