आकाशवाणीचा एक आवाज डॉ. महेश केळुसकर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 06:27 AM2019-06-23T06:27:13+5:302019-06-23T06:27:47+5:30

आकाशवाणीतील सहसंचालक आणि कवी, लेखक, कादंबरीकार, पटकथा लेखक डॉ. महेश केळुसकर हे ३६ वर्षांच्या सेवेनंतर ३० जून २०१९ रोजी आकाशवाणीतून निवृत्त होत आहेत.

A voice of All India Radio Mahesh Keluskar | आकाशवाणीचा एक आवाज डॉ. महेश केळुसकर

आकाशवाणीचा एक आवाज डॉ. महेश केळुसकर

googlenewsNext

- शिवाजी गावडे

आकाशवाणीतील सहसंचालक आणि कवी, लेखक, कादंबरीकार, पटकथा लेखक डॉ. महेश केळुसकर हे ३६ वर्षांच्या सेवेनंतर ३० जून २०१९ रोजी आकाशवाणीतून निवृत्त होत आहेत. त्यांनी आकाशवाणीसाठी विविध कार्यक्रमांची निर्मिती केली; ती श्रोत्यांच्या पसंतीस उतरली. त्यांच्या नावावर सुमारे २६ पुस्तके आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. अशा चतुरस्र व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा धांडोळा...

१२ जानेवारी १९८३ रोजी प्रसारण अधिकारी म्हणून डॉ. महेश केळुसकर आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर रूजू झाले. अल्पावधीतच ‘परफेक्शनिस्ट ब्रॉडकास्टर’ म्हणून श्रोते त्यांना ओळखू लागले ते बहुजनांशी थेट संवाद साधण्याच्या त्यांच्या कलेमुळेच. ‘आकाशवाणी तुमच्या दारी’ हा त्यांनी निर्मिती केलेला कार्यक्रम लोकप्रिय ठरला. १९९० साली रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीचे त्यांच्या टीमने २४ तास पाण्याचा घोटही न घेता रेकॉर्डिंग केले ते या परिस्थितीची जाणीव होऊन मदतीचा ओघ सुरू व्हावा यासाठीच.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन १९९१ च्या जूनमध्ये ते मुंबई केंद्रावर अधिकारी म्हणून रूजू झाले. तेथे ‘प्रभातेमनी’ हा माहिती व गाण्यांचा कार्यक्रम त्यांनी लोकप्रियतेच्या उंचीवर नेला. ‘वाईकर भटजी’ (लेखक-धनुर्धारी) या पुस्तकाचे आकाशवाणी कलावंतांकडून अभिवाचन करवून घेऊन डॉ. केळुसकर यांनी आपली ही पहिलीच मालिका तुफान लोकप्रिय केली. त्यानंतर मुंबई केंद्रावरून लागेबांधे (मधू मंगेश कर्णिक), उथव (रा. भि. जोशी), उचित (अरविंद दोडे) अशा २५ अभिवाचन मालिकांची निर्मिती केली. यात सर्वात गाजली ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातंत्र्यलढ्याची जीवन कहाणी असलेली विश्वास पाटील लिखित ‘महानायक’ ही २५० भागांची महामालिका. श्रोत्यांच्या आग्रहावरून ६ वेळा तिचे पुनर्प्रक्षेपण झाले.

मुंबई केंद्रावरची डॉ. केळुसकरांची आणखी एक ठळक निर्मिती म्हणजे ‘चिंतन हा चिंतामणी’ सदगुरू वामनराव पै यांचे प्रबोधनात्मक आध्यात्मिक विचार असलेली मालिका. रोज प्रसारित होणाऱ्या या मालिकेने १००० भाग पूर्ण केले.

‘अन्त्य वस्त्र’ (कफन-मुन्शी प्रेमचंद) साठी २००३ साली फअढअ अ‍ॅवॉर्ड आणि ‘आडाचं पानी लई खोल’ (संगीत रूपक)च्या लेखन निर्मितीसाठी अश्अ अ‍ॅवॉर्ड हे राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. २६ व २७ जुलै २००५ रोजी ३६ तास स्टुडिओत राहून त्यांच्या ‘टीम’ने सामान्यांसाठी ‘संदेश
सेवा’ प्रसारित केली. १९९२ ची मुंबई दंगल, मार्च १९९३चे बॉम्बस्फोट, १९९३ मधील किल्लारी-लातूर भूकंप अशा आपत्तीजनक परिस्थितीत आकाशवाणी मुंबई केंद्राने राज्यभरातील ताजी स्थिती जनतेला कळावी यासाठी विशेष संदेश प्रसारण सेवा दिली. याचे नियोजन, अंमलबजावणीची जबाबदारी केळुसकर यांच्यावर होती. आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर निर्मिती, प्रशासन सेवा देणाºया केळुसकर यांनी प्रत्येक केंद्रावर कार्यकुशलतेने वरिष्ठ, सहकारी, श्रोत्यांची मने जिंकली.
२०१६ साली साहाय्यक संचालक म्हणून त्यांना बढती मिळाली. लवकरच ते निवृत्त होत असले तरी श्रोते त्यांना विसरणार नाहीत, याची खात्री आहे. डॉ. महेश केळुसकर यांना निवृत्तीच्या शुभेच्छा!

Web Title: A voice of All India Radio Mahesh Keluskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई