यूपी, बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांचा जिवाची बाजी लावून प्रवास

By नरेश डोंगरे | Published: April 5, 2024 02:24 PM2024-04-05T14:24:26+5:302024-04-05T14:27:46+5:30

क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी : प्रचंड गर्दी, शाैचालयाजवळ बसून नाकतोंड दाबून प्रवास.

passengers risk their lives in trains going to up bihar | यूपी, बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांचा जिवाची बाजी लावून प्रवास

यूपी, बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांचा जिवाची बाजी लावून प्रवास

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवाशांची गर्दी होत असल्याने उत्तर प्रदेश, बिहारकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील स्थिती फारच वाईट झाली आहे. पर्याय नसल्याने प्रवासी या गाड्यांमध्ये जिवाची बाजी लावून प्रवास करीत आहेत. या संबंधिचा एक व्हीडीओ शुक्रवारी सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

एकीकडे रेल्वे मंत्रालयाने रेल्वे विकासाचा धडाका लावला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून रेल्वेचा प्रवास अधिक चांगला आणि गतीमान करण्याचे प्रयत्न केले जात आहे. रेल्वे गाड्यांमधील अनेक कोच वातानुकुलित करून प्रवास सुखद करण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र, वातानुकुलित डब्यांची संख्या वाढविताना बहुतांश रेल्वेगाड्यांमधील जनरल डब्यांची संख्या कमी झाल्याने गोरगरिब प्रवाशांची प्रचंड कोंडी झाली आहे. जनरल व्यतिरिक्त दुसऱ्या क्लासचा प्रवास परवडत नसल्याने हे बिचारे प्रवासी गावाला जाण्यासाठी रेल्वेच्या जनरल डब्यात स्वत:ला कोंबून घेत आहेत. क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी डब्यात शिरत असल्याने बसणे तर सोडा पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. खास करून युपी, बिहारकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील अवस्था फारच वाईट आहे. प्रवासी चक्क शाैचालयाजवळ बसून नाकतोंड दाबून प्रवासी करीत आहेत. यातीलच काही प्रवासी पर्यायच नसल्याने वातानुकुलित डब्यात शिरतात अन् नंतर आरक्षित आसनावर जबरदस्तीने बसून प्रवास करण्याचा करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आरक्षण करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत त्यांचा वाद होतो.

गुरुवारी सायंकाळी सिकंदराबाद - दानापूर एक्सप्रेस नागपूर स्थानकावर आली. ती येथून सुटली तेव्हा खाली उतरून परत जिवाची बाजी लावून अनेक प्रवासी धावत्या गाडीत स्वत:ला कोंबून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत होते. हा व्हिडीओ गुरुवारी रात्रीपासून सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.

काय करताहेत टीसी अन् गार्ड

विशेष म्हणजे, गाड्यांमधील प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्याची जबाबदारी टीसी आणि रेल्वे गाड्यांमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांची असते. आरक्षणाशिवाय त्या डब्यात प्रवाशांना शिरूच दिले जाऊ नये, ही त्यांची जबाबदारी असते. मात्र, ही मंडळी अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.

स्लिपर आणि जनरल डबे वाढविण्याची मागणी

व्हायरल व्हिडीओतून प्रवाशाच्या जिवाला कसा धोका आहे, त्याची कल्पना येऊ शकते. या पार्श्वभूमीवर, भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे आज एकपत्र लिहून उपरोक्त प्रकाराची गंभीर दखल घेण्याची विनंती केली आहे. स्लिपर आणि जनरल डबे वाढविण्याची मागणीही त्यांनी या पत्रातून केली आहे.

Web Title: passengers risk their lives in trains going to up bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.