मी नरेंद्र दाभोळकर बोलतोय...
By Admin | Updated: July 20, 2014 01:18 IST2014-07-20T01:18:24+5:302014-07-20T01:18:24+5:30
समाजातील अन्याय, अत्याचार, कर्मकांड व अंधश्रद्धा त्याला अस्वस्थ करते. पण तो आयुष्यभर ती मनात दाबून जीवन जगत असतो. मात्र त्याचवेळी नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येच्या तपासाची

मी नरेंद्र दाभोळकर बोलतोय...
‘दाभोळकरांचे भूत’ नाटकाचा प्रयोग : सत्यनारायणाकडून सत्याग्रहाकडे नेणारी कलाकृती
नागपूर : समाजातील अन्याय, अत्याचार, कर्मकांड व अंधश्रद्धा त्याला अस्वस्थ करते. पण तो आयुष्यभर ती मनात दाबून जीवन जगत असतो. मात्र त्याचवेळी नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येच्या तपासाची त्याच्यावर जबाबदारी दिली जाते. त्याचवेळी त्याच्या गावातील काही कर्मठ लोक रमेश नावाच्या एका निरपराध तरुणाची निर्घृण हत्या करतात. त्याचा दारूने मृत्यू झाला, असा रिपोर्ट तयार करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकल्या जातो. या सर्व घटनांमुळे तो पुन्हा व्यथित होतो आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणाऱ्या नरेंद्र दाभोळकरांच्या भूताने तो झपाटतो. विठ्ठल शेडमाके असे त्या पोलीस हवालदाराचे नाव असते. येथून तो अन्यायाविरुद्ध बोलू लागतो. कर्मकांड व अंधश्रद्धेला विरोध करू लागतो. अन् मी नरेंद्र दाभोळकर बोलतोय...असे छातीठोकपणे सांगतो.
श्याम पेठकर लिखित ‘दाभोळकरचे भूत’ या नाटकातील हा प्रसंग प्रेक्षकांच्या डोळ्यापुढे नरेंद्र दाभोळकरांना उभे करतो. हरीश इथापे यांचे दिग्दर्शन व समीर पंडित यांची निर्मिती असलेल्या या नाटकाचा शनिवारी सायंटिफिक सभागृहात पहिला प्रयोग झाला. सत्यनारायणाकडून सत्याग्रहाकडे नेणाऱ्या या कलाकृतीतील हवालदार शेडमाके यांचे पात्र अंधश्रद्धाळू कर्मठ लोकांसाठी मोठे संकट ठरतो. त्यामुळे शेडमाके यांच्यातील भूत दाभोळकरांच्या मारेकऱ्यांची नावे तर जाहीर करणार नाही ना, अशी सर्वांनाच भीती वाटू लागते. या भीतीने मठाचे अण्णासाहेब यांची झोप उडते. ते अस्वस्थ होतात. शेवटी आमदारांच्या माध्यमातून शेडमाके यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र शेडमाके यांच्या अंगातील दाभोळकरांचे भूत कोणत्याही दबावाला जुमानत नाही.
शेडमाके ओरडून आपल्या अंगात कोणतेही भूत नसल्याचे वारंवार सांगतो. पण अण्णासाहेब व त्याचे सहकारी त्याला भुताने झपाटल्याचा गवगवा करतात. दरम्यान दाभोळकर समर्थकांच्यावतीने शेडमाके याची एक जाहीर सभा आयोजित केली जाते. परंतु अण्णासाहेब व आमदार पोलिसांवर दबाव टाकून ती सभा रद्द करतात. त्या जाहीर सभेत शेडमाके यांच्या अंगातील भूत दाभोळकरांच्या मारेकऱ्यांची नावे सांगेल, अशी सर्वांना भीती असते. त्यामुळे शेडमाके यांना नजरकैद केल्या जाते. पण लोकांच्या दबावामुळे आमदारांना शेडमाके यांना लोकांपुढे आणावे लागते.
येथे शेडमाके स्वत: च माझ्या अंगात भूत आहे, की नाही. असा प्रश्न थेट अण्णाला विचारतो. अंधश्रद्धा मानत नसल्याचे ढोंग करणाऱ्या अण्णा आणि त्याच्या सहकाऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहतो. शेवटी अण्णाला शेडमाकेच्या अंगात भूत नाही, हे कबूल करावे लागते. त्यावर शेडमाके माझ्या अंगात भूत नाही, तर मला समाजासमोर बोलण्यापासून कां रोखता, माझ्या विचारांना तुम्ही कां घाबरता, अशा प्रश्नांचा भडिमार करतो. यात आधी ‘विचारवंताला मारून टाकायचे, अन् मग त्याच्या विचारांना भूत म्हणायचे.’ हा शेडमाके यांचा संवाद बरेच काही सांगणारा आहे. अशा या उत्कृष्ट कलाकृतीत हवालदार शेडमाके यांची भूमिका राजा भगत यांनी पार पाडली. त्यांची पत्नी म्हणून मंजुषा भांड, (आमदार) अरविंद बाभळे, (अण्णा) अशोक तत्त्ववादी व (पोलीस इन्स्पेक्टर ) रूपराव कांबळे यांच्यासह अमित मुळे, अमर इलमे, सुहास नगराळे, श्वेता क्षीरसागर, संहिता इथापे, विनोद बांगलवार यांनी वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या. (प्रतिनिधी)