सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आर्थिक विषमतेची दरी वाढतेय, कोट्यवधी नागरिकांचे मासिक उत्पन्न १० हजारांपेक्षाही कमी - प्रो. अरुणकुमार
By नरेश डोंगरे | Published: November 25, 2023 10:24 PM2023-11-25T22:24:46+5:302023-11-25T22:25:32+5:30
'पीस' या सामाजिक संघटनेच्या वतीने विनोबा विचार केंद्रात 'देश मे बेहताशा बढती आर्थिक विषमता' या विषयावर प्रो. अरुण कुमार यांच्या व्याख्यानाचे शनिवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते.
नागपूर : देशातील कोट्यवधी नागरिकांचे मासिक उत्पन्न १० हजारांपेक्षाही कमी आहे. तर, दुसरीकडे मुठभर लोकांचे उत्पन्न लाखो - करोडोंमध्ये आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात अशी प्रचंड आर्थिक विषमता निर्माण झाली असल्याचे मत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) माजी व्याख्याते आणि ख्यातनाम अर्थतज्ज्ञ प्रो. अरुण कुमार यांनी मांडले.
'पीस' या सामाजिक संघटनेच्या वतीने विनोबा विचार केंद्रात 'देश मे बेहताशा बढती आर्थिक विषमता' या विषयावर प्रो. अरुण कुमार यांच्या व्याख्यानाचे शनिवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून अमरावतीच्या रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे आणि विशेष अतिथी म्हणून जस्टीस (निवृत्त) बी. जी. कोळसे पाटील उपस्थित होते.
देशातील शेतकरी, मजूर, मध्यमवर्गीय व्यापारी-उद्योजक, भांडवलदार यांच्या उत्पन्नाचे विस्तृत विश्लेषण करून अरुण कुमार यांनी सरकारचे धोरण सर्वसामान्यांची आर्थिक कंबरमोड कशी करत आहे, त्यावर भाष्य केले. गरज नसताना काळे धन बाहेर काढण्याच्या आणि टेरर फंडिंगच्या नावाखाली सरकारने नोटबंदी केली. त्याचे तर काही झाले नाही मात्र नोटबंदीमुळे आमची अर्थव्यवस्था कोलमडली. ते होत नाही तर जीएसटी लादला. यामुळे छोटे व्यापारी, सर्वसामान्य नागरिक यांच्यावर नाहक आर्थिक बोझा वाढला. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणूस, कष्टकरी जनतेचे होते नव्हते सारेच हिसकावून घेतल्यासारखे झाले.
शिक्षणाचे धोरण, तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण आणि वैश्वीकिकरण, बेरोजगारीचाही त्यांनी सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, एका नोकरीसाठी शेकडो उमेदवार धडपडताना दिसतात. उच्चशिक्षित तरुण चपराशाची नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करतात. वारंवार प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसल्याने हे तरुण नैराश्याने ग्रस्त होतात. अनेक जण व्यसनाधीन होतात तर काही जण गुन्हेगारीकडे वळतात. यांत्रिकीकरणावर जोर दिला जात आहे. त्यामुळे ४ जणांचे काम एक जण करतो. अर्थात तीन जण बेरोजगार झाले आहे. ४५ वर्षांतील सर्वात निचांकी स्तर बेरोजगारीचा आला आहे. भविष्यात तंत्रज्ञानाचेही दुष्परिणाम समोर येण्याची भीती त्यांनी वर्तविली.
देशातील २५ कोटी लोकांना घरापासून ५ किलोमीटर अंतरापर्यंत आरोग्याच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत. या सर्व बाबी देशात प्रचंड आर्थिक विषमता वाढविणाऱ्या आहेत. एकूणच चुकीच्या धोरणांमुळे गरीब अधिक गरीब, तर श्रीमंत अधिक श्रीमंत बनत असल्याचेही प्रो. अरुणकुमार म्हणाले.
यावेळी बी.जी. कोळसे पाटील यांनी मानव केंद्रित विकास केवळ स्वप्नासारखा असल्याचे म्हटले. अर्थव्यवस्था मोजक्या भांडवलदारांच्या हातात असल्याचे सांगून त्यांनी सरकारी शाळा बंद पडण्याची पार्श्वभूमी विशद केली. या बंद पडलेल्या शाळा अंबानी, अदाणी यांच्या हातात देण्याचे धोरण आखले जात आहे. जर या शाळा त्यांच्या हातात गेल्या तर गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचे काय होणार, याची कल्पनाच केलेली बरी, असे म्हटले. तर, डॉ. देशपांडे यांनी आधीच्या वक्त्यांचा धागा पकडून सर्व साधन सुविधा असूनही विदर्भाचा विकास झाला नाही, त्याला हेच धोरण कारणीभूत असल्याचे म्हटले.
प्रारंभी कार्यक्रमाची रूपरेषा 'पीस'चे शाम पांढरीपांडे यांनी मांडली. पाहुण्यांचा परिचय प्रकाश मेघे यांनी, स्वागत पत्रकार विवेक देशपांडे आणि शामला सन्याल यांनी तर आभार प्रदर्शन पत्रकार जयदीप हर्डीकर यांनी केले.