असं होतं असं आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 04:26 PM2018-02-03T16:26:39+5:302018-02-04T07:13:21+5:30

गावात पूर्वी अठरापगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. सगळ्यांची परिस्थिती जवळपास सारखीच. एकाही जवळ कार नव्हती. गावात दवाखाना नव्हता. कॉलेज नव्हतं. सायकल चालवणारी एकच महिला. शिक्षिकाही एकच. वीज नाही, नळ नाही.. आज गावात तेरा शाळा आहेत. एकट्या मार्केट कमिटीची उलाढाल तीन हजार कोटी! शंभरावर डॉक्टर, सुसज्ज हॉस्पिटल्स, हजारावर कार. वीज आहे, पाणी आहे. सायकल चालवणारी मुलगी पहायला पूर्वी गाव लोटायचं, आता विमान डोक्यावरून गेलं, तरी कोणी डोळे वर करून पाहात नाही..

That is what it was | असं होतं असं आहे

असं होतं असं आहे

googlenewsNext

- विनायक पाटील

माझ्या मामाचे गाव पिंपळगाव बसवंत. माझा जन्म आणि मराठी चौथीपर्यंतचे शिक्षण तिथलेच. जन्म १९४३चा. चौथीत १९५३ साली. म्हणजे जन्मापासूनची पहिली दहा वर्षे वास्तव्य पिंपळगावलाच. मला बालपणातील आठवणी साधारण वयाच्या सहाव्या वर्षापासून आहेत. म्हणजे आठवणींचा धागा साधारण सत्तर वर्षे मागे जातो.
त्या काळचे पिंपळगाव एक टुमदार गाव. गावातून पाराशरी नदी वाहत असे. पाराशरीला वर्षातून आठ ते नऊ महिने पाणी असे. मोठी गोड नदी. पिंपळगावच्या खाली बेहेड येथे कादवेला मिळणारी. म्हणजे गावाला दोन नद्या पाराशर आणि कादवा. गावाची लोकसंख्या पाच हजाराच्या आसपास असावी. गावाला ग्रामपंचायत तसेच पोलीसपाटील आणखी मुलकी पाटील दोन्ही पदे. मुख्य व्यवसाय शेती. तरी आजूबाजूच्या गावांची बाजारपेठ असल्यामुळे गावात किराणा व कपड्यांची दुकाने, एक मेडिकल स्टोअर्स, कांद्याची बाजारपेठ असल्याने गावात व्यापाºयांची घरे. कोर्ट असल्यामुळे वकिलांची घरे. गावात राजवाडा, कोळवाडा, मुसलमान मोहल्ला, साळी गल्ली, माळी गल्ली, अठरापगड जातीचे व धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने नांदत होते. मोरे आणि बनकर ही मराठ्यातली प्रमुख आडनावे. त्यांच्यात अधूनमधून मारामाºया होत एवढाच अपवाद. गावात सातवीपर्यंत लोकल बोर्डाची शाळा, हायस्कूलला नुकतीच सुरुवात झालेली. गावात शेती आणि वकिली व्यवसाय असलेली कोकणस्थ ब्राह्मणांची सात-आठ कुटुंबे, गावाशी समरस झालेली. प्रगतिशील शेतकरी द्राक्ष शेती करीत. पांगाºयावर चढवलेले द्राक्षवेल आणि भोकरी ही व्हरायटी.
गावात तांबे आडनावाचे वैद्य आणि नाशिकहून आठवड्यातून एक दिवस मोटारसायकलवर येणारे पटवा नावाचे डॉक्टर. गावात एक पत्र्यांच्या भिंती व छप्पर असलेले थिएटर. सिनेमा सुरू झाला की सगळ्या गावाला ऐकू येत असे. सिनेमा न पहाणाºयांचीही गाणी पाठ होत. गावात मोजून चार किंवा पाच रेडिओ. गांधी हत्येची बातमी ऐकण्यासाठी अवस्थी नावाच्या कुटुंबाच्या दुकानापुढे झालेली प्रचंड गर्दी आठवते. आग्रारोड गावाच्या मध्यातून जात असे. पाराशरीला राममंदिराजवळ एक डोह होता. त्याचे नाव गोपाळबाबाचा डोह. तिथे किनाºयावर वडाचे सात प्रचंड मोठे वृक्ष होते. त्याला ‘सातीवड’ म्हणत. दिवसासुद्धा भीती वाटायची. सातीवड आणि गोपाळबाबाचा डोह यांच्या गूढ आणि रंजककथा गावभर ऐकायला येत. पाराशरी जेथे कादवेला मिळते तेथे एक डोह. डोहात सुसरी असत. विष्णुपंत भिडे या सुसरींचा त्रास वाढला की शिकार करीत. गावात मोरच मोर होते. ज्यांची घरं गावाबाहेर किंवा शेतात होती त्यांनी कुरड्या, पापड, सांडगे किंवा इतर वाळवण घातले तर मोर त्रास देत म्हणून प्रसंगी हुसकावे लागत इतके मोर. शाळेत जाणाºया बहुतेक मुलाजवळ पत्र्याच्या पाट्या असत. फुटू नयेत म्हणून पत्र्याच्या. शाळेत जाणाºया बहुतेक मुलांच्या डोक्यावर पांढºया टोप्या असत. पायात चपला-बूट क्वचित असत, सगळे अनवाणी. वर्गात बसायला बस्कर असत. मुलं मांडी घालून बसत. सूत कताई अनिवार्य होती. मोडी लिपीही शिकवली जाई. कॉलेजला नाशिक येथे जावे लागे. गंभीर आजार असला किंवा अपघात झाला तर नाशिकला जावे लागे. एस.टी.नंतर आली. प्रवास युनियनच्या गाड्यांनी करावा लागे. गावात माझ्या आठवणीप्रमाणे कोणाही जवळ मोटार नव्हती. दोन होत्या; पण त्या काळ्यापिवळ्या भाड्याने दिल्या जाणाºया टॅक्सीज्. एक जगताप मास्तरांची, दुसरी बाबूराव बनकरांची. टॅक्सीने प्रवास करणे श्रीमंतीचे लक्षण समजले जाई. गावात काही घरी येणाºया हरिजनांना चहा देण्यासाठी वेगळे कप व बशा असत. दिवाळी-दसरा मोठ्या प्रमाणात साजरे होत. रामनवमीला रामाची यात्रा भरायची. कुस्त्या, तमाशे वगैरे वगैरे. गावात बोहाडा नाचायचा. साळी गल्लीत प्रत्येक घरी हातमाग होते, त्यावर विणकाम नियमित चाले. गावाला पाचशे एकरापेक्षा अधिक क्षेत्र असलेले कुरण होते. बहुतेकांचे बैल चरायला रात्री कुरणात पाठवत. मालक स्वत: बैल चरायला नेत.
सौ. सुधाताई गद्रे या सायकल चालविणाºया पहिल्या महिला. त्यांचे माहेर पुण्याचे. त्या नऊवारी लुगड्यात सायकलवर स्वार होऊन उभ्या पेठेतून स्वत:च्या शेतात जात. त्यांचे पती हरिभाऊ गद्रे हे नावाजलेले वकील. सुधाताईंची शेतात जाण्याची ठरावीक वेळ असे. सायकल चालवणारी बाई पाहण्यासाठी कौतुकाने लोक ओट्यावर उभे राहात. सबंध गावात ट्रॅक्टर एक. गावात वीज नव्हती. ग्रामपंचायतीचे कंदील असत.
काही ठिकाणी ग्रामपंचायतीने पेट्रोमॅक्स लावले होते त्याचे केवढे कौतुक होत असे. पंचक्रोशीत शिक्षिका म्हणून शिकविणाºया बहुजन समाजातील एकमेव शिक्षिका जगताप मास्तरांच्या भगिनी मुलींच्या प्राथमिक शाळेत शिकवित असत. बहुजन समाजातील त्या भागातील पहिल्या शिक्षिका म्हणून त्यांचे कौतुकही आणि आदरही. गावात रामाचे, शंकराचे, मारुतीचे, बसवंतेश्वर यांची मंदिरे. मशीद, दर्गा, जैनस्थानक ही जागतिक धर्मस्थळे होती. एकंदरीत काय तर भारतातील खेडे नव्हे तर गाव या संज्ञेत मोडणारे एक सर्वसमावेशक, समाधानाने नांदणारे एक गाव पिंपळगाव (बसवंत).
हे वर्ष आहे २०१८. गावची लोकसंख्या झाली आहे एक्केचाळीस हजार. गावात तेरा शाळा आहेत. शंभरपेक्षा अधिक मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत. चाळीसपेक्षा अधिक सुसज्ज हॉस्पिटल आहेत. तीन हजार कोटींची वार्षिक उलाढाल असणारी मार्केट कमिटी आहे. गावात दोन हजारपेक्षा अधिक ट्रॅक्टर आहेत. एक हजारपेक्षा जास्त मोटरकार आहेत. पस्तीस बँकांनी त्यांच्या शाखा स्थापन केल्या आहेत. पाचशेपेक्षा अधिक किराणा दुकाने आहेत. दोनशेपेक्षा अधिक कापड दुकाने आहेत. गावात वीज आहे, नळाचे पाणी आहे. प्रत्येक घरात पदवीधर मुले-मुली आहेत.
पाराशरी आटली आहे. मन्याडी लुप्त झाली आहे. गावात आणि शेतात मोर उरले नाहीत. सुसरींच्या आठवणी उरल्या आहेत. गोपाळबाबांचा डोह कोरडाठाक आहे. सायकल चालवणे पाहण्यासाठी वेळ देणारे लोक आता मिग विमान डोक्यावरून गेले तरी डोळे वर करून पाहात नाहीत. मुली मोटारसायकली व मोटारी चालवतात. अनेकजण नोकरीच्या निमित्ताने परदेशी आहेत. ज्या गावांत हरिजनांसाठी काही ठिकाणी वेगळ्या कपबश्या ठेवल्या जात, त्याच गावात हरिजनांनी चालवलेली व लोकांच्या पसंतीस उतरलेली काही चहाची हॉटेल्स आहेत.
हे सगळे गेल्या साठ वर्षातील बदल आहेत. काही अधिक आहे, काही उणे आहे. काही मिळवलं आहे, काही गमावलं आहे. थोडक्यात, ‘हे असं होतं ते आता असं आहे’ एवढंच.
(साहित्य-कला आणि शेतीसह अनेक विषयांमध्ये सखोल जाण असलेले लेखक महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आहेत.  vinayakpatilnsk@gmail.com)

Web Title: That is what it was

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.