रंगमंच - विसरलो..! ब्लँक.....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 07:00 AM2018-10-28T07:00:00+5:302018-10-28T07:00:00+5:30

स्टेजवर ब्लँक होण्याचे किस्से वाचताना किंवा आठवताना हसू जरी येत असलं तरी प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी त्या कलाकाराची वाट लागलेली असते. का एखादा कलाकार असा ब्लँक होत असावा किंवा चालू प्रसंगातले सोडून भलतेच संवाद म्हणत असावा. मला वाटतं, एकाग्रता विचलित होणे हे महत्त्वाचं कारण आहे.

Theater - Forgot ..! Blank ..... | रंगमंच - विसरलो..! ब्लँक.....

रंगमंच - विसरलो..! ब्लँक.....

Next

- योगेश सोमण- 
परवा एका चित्रपटाचं चित्रीकरण करीत होतो. चित्रीकरणादरम्यान माझे संवाद विसरलो, ब्लँक झालो. शॉट कट झाला, रिटेकची तयारी सुरू झाली, रिटेक देण्याअगोदर अर्धा पेग चहादेखील घेतला आणि ड‘ टेक दिला. हे सगळं किती सोपं छान वाटतंय ना वाचायला, पण हेच नाटकाच्या प्रयोगादरम्यान घडलं असतं तर. पाय लटपटले असते, कानशील तापली असती, घशाला कोरड पडली असती, अंधारी आली असती, पुढचं सगळं नाटक आठवलं असतं, पण जिथे अडकलोय त्याच्या आसपासचं काहीही आठवत नसतं आणि मनात आपसूक येतं, आयला विसरलोय, ब्लँक झालोय आपण. चित्रपटाप्रमाणे नाटकात रिटेक नाही. जे काही होणार ते समोरासमोर, कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात. अवघडच असतं, म्हणूनच नाटकातील भूमिका ‘पेलली’ असं म्हणतात. भूूमिका ‘पेलत’ असताना ब्लँक झाल्यानंतरचे किस्से आधी शेअर करतो आणि मग ब्लँक होण्यामागच्या कारणांचा मागोवा घेतो.
(कै.) मधुकर तोरडमल यांनी सांगितलेला किस्सा, शिवाजी मंदिरला ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’चा प्रयोग होता, या प्रयोगापर्यंत सव्वाशेच्यावर प्रयोग होऊन गेले होते. शिवाजीचा ‘तो’ प्रयोग हाऊसफुल होता. तोरडमल स्वत: त्या नाटकाचे लेखक, तेच बारटक्केची भूमिका करीत, सव्वाशेहून अधिक प्रयोग झालेले तरीही रंगमंचावर प्रवेश केल्यावर मामांना त्यांचं पहिलं वाक्य आठवेना, स्वत:चे म्हणून खूप प्रयत्न केले, सहकलाकारांनी वेगवेगळे क्ल्यूज देण्याचा प्रयत्न केला, विंगेमधून प्रॉम्टिंग झालं तरीही मामांना काही केल्या लिंक लागेना, नाटकाच्या प्रयोगात ही सिच्युएशन भयाण असते. प्रेक्षकांत चुळबुळ सुरू झाली. ‘विसरले बहुतेक’ ‘तोरडमल विसरले,’ अशी कुजबुज ऐकू येऊ लागली आणि तोरडमलांनी बोलायला सुरुवात केली. ‘माफ करा, मी विसरलोय, मी ग्रीनरूममध्ये जाऊन एक पाच मिनिटे शांत बसतो आणि परत प्रयोगाला सुरुवात करतो.’ मामा उठून ग्रीनरूममध्ये गेले, ३-४ मिनिटे शांत बसले, तोपर्यंत रंगमंच रिकामा होता, पण पडदा टाकला नव्हता. अल्प विश्रांतीनंतर मामा स्टेजवर आले, प्रयोग सुरू झाला आणि तुफान रंगला. इंटरवलमध्ये कुणाला ‘त्या’ प्रसंगाची आठवणही राहिली नाही.
पुण्यातल्या एका एकांकिका स्पर्धेत ‘म्याव’ नावाची एकांकिका चालू होती, तुफान चालली होती, एकांकिका नक्की जिंकणार, अशी सगळ्यांची खात्री होती आणि अचानक एक कलाकार थांबला, ब्लँक झाला, कावराबावरा झाला, दुसºया सहकलाकाराने तोंडावर हात धरून हळूच पुटपुटत, ब्लँक कलाकाराच्या अवती भवती फिरत त्याला विसरलेले डायलॉग्ज ऐकवले, पण ब्लँक कलाकाराचं टेन्शन काही ऐकण्याच्या आणि आठवण्याच्या पलीकडे गेले होते. प्रेक्षकांनाही ‘ते’ ब्लँक झाल्याचं कळलं होतं. अखेरीस ‘त्या’ कलाकाराने हात जोडले, ‘माफ करा मी ब्लँक झालोय, मला काही आठवत नाहीये.’ ‘पडदा टाका,’ असं म्हणून एक्झिट घेतली आणि एकांकिकेवर पडदा पडला.
एकदा ‘सुपारी डॉट कॉम’ या स्वत:च्याच नाटकात अस्मादिकांनीच माती खाल्ली होती. प्रयोगात, अभिनयाच्या नादात नकळतच भलत्याच प्रसंगातले संवाद म्हणायला लागलो, ज्याच्याबरोबर त्या प्रसंगातले संवाद होते तो स्टेजवर दिसेना कारण त्याच्याबरोबरचा प्रसंग बराच नंतर होता, त्यामुळे तो निवांत विंगेमध्ये खुर्चीवर बसला होता. मला तो विंगेत दिसल्या दिसल्या मी आगाऊपणे त्याचं नाटकातील नाव घेऊन त्याला बोलावलं, तोही धडपडत स्टेजवर आला, त्याला काही कळेना काय घडतंय आणि माझ्या चेहºयावर भाव असे होते, की समोरचा चुकलाय आणि मी त्याची चूक निस्तरतोय. तो जवळ आला आणि अचानक मी दोन पान मारलेली उडी माझ्या लक्षात आली, जिथे अडकलो होतो त्या प्रसंगातील संवाद आठवायला लागले, पण शेजारी बावरून उभं राहिलेल्या कलाकाराचं काय करायचं? शांतपणे त्याच्या खांद्यावर थोपटले, हाक मारल्या मारल्या लगेच येशील असं वाटलं नव्हतं, जा तू. तुला नंतर बोलावतो, असं म्हणून त्याची पाठवणी केली आणि प्रसंग पुढे चालू केला.    (पूर्वार्ध)   

 (लेखक प्रसिद्ध रंगकर्मी आहेत.)

Web Title: Theater - Forgot ..! Blank .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.