स्टार्ट - अप नेशन...तेल अवीवमध्ये झालेल्या ‘फ्यूल चॉइसेस अ‍ॅण्ड स्मार्ट मोबिलिटी समिट’च्या निमित्ताने 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 02:00 AM2017-12-03T02:00:00+5:302017-12-03T02:00:00+5:30

तेल अवीवमध्ये नुकत्याच झालेल्या ‘फ्यूल चॉइसेस अ‍ॅण्ड स्मार्ट मोबिलिटी समिट’च्या निमित्ताने 

Start Up Nation ... on the occasion of 'Fuel Choice and Smart Mobility Summit' in Tel Aviv | स्टार्ट - अप नेशन...तेल अवीवमध्ये झालेल्या ‘फ्यूल चॉइसेस अ‍ॅण्ड स्मार्ट मोबिलिटी समिट’च्या निमित्ताने 

स्टार्ट - अप नेशन...तेल अवीवमध्ये झालेल्या ‘फ्यूल चॉइसेस अ‍ॅण्ड स्मार्ट मोबिलिटी समिट’च्या निमित्ताने 

Next

रवि टाले

साधारणत: अठराव्या शतकाचा मध्य ते एकोणविसाव्या शतकाचा मध्य, या सुमारे शंभर वर्षांच्या कालखंडात पहिल्या औद्योगिक क्रांतीने मनुष्याचे जीवन आमूलाग्र बदलून टाकले. मनुष्य हाताऐवजी यंत्राच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन करू लागला आणि कारखाना या प्रणालीचा जन्म झाला. पुढे दुसºया औद्योगिक क्रांतीमुळे जलद औद्योगिक विकासाला चालना मिळाली. त्यानंतर सुमारे शंभर वर्षांनी तिसºया औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. इलेक्ट्रॉनिक्सचा उदय झाला. ट्रान्झिस्टर, मायक्रोप्रोसेसर, संगणक आणि मोबाइल फोनसारख्या उन्नत दूरसंचार प्रणालीने मनुष्य जीवन ढवळून काढले. या क्रांतीने उद्योग क्षेत्राला उत्पादनातील उच्च दर्जाच्या स्वयंचलन (आॅटोमेशन) प्रक्रियेची देण दिली. यंत्रमानव आणि प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर (पीएलसी) ही या क्रांतीचीच फळे!
आताच्या चवथ्या औद्योगिक क्रांतीचा पट उलगडू लागला आहे. संगणक महाजालाचा म्हणजेच इंटरनेटचा उदय, ही या क्रांतीची नांदी. प्रारंभीच्या तीनही औद्योगिक क्रांतीची सांगड नव्या स्वरूपातील ऊर्जेशी घातल्या गेली. वाफेच्या शक्तीने पहिल्या, विद्युत शक्तीने दुसºया, तर आण्विक शक्तीने तिसºया क्रांतीला चालना दिली. चवथ्या क्रांतीस चालना देण्याचे काम मात्र एखादी नव्या स्वरूपातील ऊर्जा नव्हे, तर डिजिटायझेशन करणार आहे. एका काल्पनिक जगाची बांधणी करून, त्याद्वारे भौतिक जगाचे संचालन करण्याची क्षमता डिजिटायझेशनमुळे प्राप्त झाली आहे. संगणकीय महाजालाशी संबद्ध असलेल्या वस्तू म्हणजेच इंटरनेट आॅफ थिंग्ज, कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स), अद्ययावत शहरे (स्मार्ट सिटी), अद्ययावत गमनशीलता (स्मार्ट मोबिलिटी), स्वयंचलित वाहने (आॅटोनॉमस व्हिकल्स), स्वयंचलित विमाने (ड्रोन), विजेच्या शक्तीवर धावणारी वाहने, आदी कल्पनातीत गोष्टी हा चवथ्या औद्योगिक क्रांतीचा चेहरा आहे.
या क्रांतीचे जास्तीत जास्त लाभ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी जगभरातील देश आतुर आहेत. आजच्या घडीला तरी फिनलंड, स्वित्झर्लंड, स्वीडन, इस्राएल, सिंगापूर, नेदरलॅण्ड्स आणि अमेरिका हे सात देश या स्पर्धेत आघाडीवर दिसत असल्याचे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
त्या सात देशांपैकी एक असलेला इस्राएल या संदर्भात खूप महत्त्वाकांक्षी आहे. शोध आणि उपक्रमशीलतेचा ध्यास असलेल्या नागरिकांचा देश अशी ख्याती असलेल्या इस्राएलमध्ये गेल्या चार वर्षांपासून ‘फ्यूल चॉइसेस आणि स्मार्ट मोबिलिटी समिट’ही आंतरराष्ट्रीय परिषद होते. इस्रायली स्टार्ट-अप कंपन्यांनी पर्यायी इंधने आणि स्मार्ट मोबिलिटीच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे जगापुढे प्रदर्शन घडविणे, हा या परिषदेच्या आयोजनामागील उद्देश असतो. यावर्षी तेल अविव या इस्राएलच्या आर्थिक राजधानीतील हबिमा नॅशनल थिएटरमध्ये पाचवी परिषद पार पडली.
या परिषदेच्या वृत्तांकनासाठी इस्राएलच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रमुख देशांमधील तेरा प्रसारमाध्यमांना निमंत्रण दिले होते. त्यामध्ये भारतातून केवळ ‘लोकमत’चा समावेश होता.
या द्विदिवसीय परिषदेच्या विविध सत्रांमध्ये, जगभरातील अनेक बड्या वाहन उत्पादक कंपन्यांचे कर्तेधर्ते आणि इस्राएलमधील विविध स्टार्ट-अप कंपन्यांचे कल्पक युवा उद्योजक सहभागी झाले होते. ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांनी भारतीय उद्योग जगताचे प्रतिनिधित्व केले. त्यांची प्रकट मुलाखत परिषदेच्या पहिल्या दिवशी झाली. इस्राएलची कल्पकता आणि स्वस्त दरात औद्योगिक उत्पादन करण्याची भारताची क्षमता, यांची सांगड घातल्यास उभय देश चमत्कार करू शकतात, अशी मांडणी त्यांनी मुलाखतीदरम्यान केली.
भविष्यातील वाहन तंत्रज्ञान कसे असेल, खनिज तेलास पर्याय ठरणारी भविष्यातील इंधने कोणती असतील, स्मार्ट मोबिलिटीची एकंदर वाटचाल कशी असेल, तसेच वायू प्रदूषणाची समस्या, आदी मुद्द्यांचा वेध घेणाºया या परिषदेच्या जोडीला, नव्या वाहन तंत्रज्ञानाची चुणूक दाखविणाºया प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बॅटरीवर चालणाºया वाहनांसोबतच, वाहतुकीच्या समस्येवरील तोडगे असलेल्या अनेक संगणकीय कार्यक्रमांचे प्रदर्शन करण्यात आले.
या परिषदेच्या निमित्ताने इस्राएलमधील अनेक स्टार्ट-अप कंपन्यांना भेटी देता आल्या. स्टार्ट-अप नेशन अशी ख्याती प्राप्त केलेल्या इस्राएलमधील स्टार्ट-अप कंपन्यांची कामगिरी सध्या जगभरात चर्चिली जाते आहे.
येत्या चार वर्षांत पहिले स्वयंचलित वाहन ग्राहकाच्या ताब्यात देण्याचा ध्यास घेतलेली मोबिलाए ही स्टार्ट-अप कंपनी. मायक्रोप्रोसेसरच्या जगातील आघाडीचे नाव असलेल्या इंटेल या बड्या कंपनीने गत मार्चमध्ये तब्बल १५.३ अब्ज डॉलर्स मोजून अधिग्रहित केली.
इस्राएलच्या इतिहासातील हे सर्वात मोठे अधिग्रहण ठरले आहे. मोबिलाएच्या अधिग्रहणासाठी मोजण्यात आलेली प्रचंड मोठी रक्कम हे एक विरळा उदाहरण असले तरी, अशा अनेक स्टार्ट-अप कंपन्यांमध्ये जगभरातील अनेक भांडवल गुंतवणूकदारांनी मोठमोठ्या गुंतवणुकी केल्या आहेत. त्यापैकी बºयाच तंत्रज्ञानांचा तर अजून विकासच सुरू आहे.
इस्राएलकडे नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभाव आहे. गेल्या दशकाच्या अखेरीस समुद्रात नैसर्गिक वायूचे मोठे साठे सापडेपर्यंत इस्राएलला सर्व प्रकारचे इंधन आयातच करावे लागत होते. या चिमुकल्या देशाला निसर्गाने पुरेसे पाणीदेखील दिले नाही. बहुधा निसर्गाचाही इस्रायली मेंदूच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास असावा! नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अभावामुळे इस्राएलने उपक्रमशीलता व सर्जनशीलतेलाच भांडवल बनविले. नागरी संशोधन क्षेत्रावर खर्च करण्याच्या बाबतीत इस्राएल जगात पहिल्या क्रमांकावर आहे. सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपीच्या तब्बल ४.२५ टक्के रक्कम इस्राएल त्यासाठी खर्ची घालतो. एकाही कारचे उत्पादन न होणाºया इस्राएलमध्ये त्यामुळेच जगभरातील वाहन उत्पादक कंपन्यांची नव्या तंत्रज्ञानासाठी रीघ लागली आहे. अर्थात हे यश इस्राएलला सहजासहजी मिळालेले नाही. त्यामागे प्रचंड नियोजन आणि मेहनत आहे.
मेंदूची क्षमता व उपक्रमशीलतेच्या बळावर किती धवल यश प्राप्त केले जाऊ शकते, याचे इस्राएल हे उत्कृष्ट उदाहरण आहे. रतन टाटांनी सुचविल्यानुसार, स्वस्तात उत्पादन करण्याच्या भारताच्या क्षमतेला इस्राएलच्या तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास, उभय देश जगाला उच्च तंत्रज्ञानयुक्त उत्पादने अत्यंत स्वस्त दरात पुरवू शकतात आणि त्या माध्यमातून स्वत:ची प्रगती साधू शकतात; मात्र त्यासाठी भारतालाच पुढाकार घेऊन हा मुद्दा इस्राएलच्या गळी उतरवावा लागेल.
आजच्या घडीला तरी इस्राएली स्टार्ट-अप कंपन्यांच्या नियोजनात भारताला काहीही स्थान दिसत नाही. त्यांचे लक्ष आहे ते उत्तर अमेरिका व युरोपमधील देश आणि काही प्रमाणात चीन व दक्षिण कोरियाकडे! इस्रायली स्टार्ट-अप कंपन्यांना रस असलेल्या देशांच्या यादीत भारताला शिरकाव करायचा असेल, तर आपल्या राज्यकर्त्यांना तशी इच्छाशक्ती दाखवावी लागेल.

१. उपक्रमशीलतेच्या बळावर भांडवल निर्मिती करण्याच्या उद्देशाने तशी शिक्षण प्रणाली इस्राएलने जाणीवपूर्वक विकसित केली.
२. जगातील बहुतांश विद्यापीठांमध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण कार्यालये (टीटीओ) आहेत. विद्यापीठांमध्ये विकसित झालेले तंत्रज्ञान व्यावसायिक उपयोगासाठी हस्तांतरित करण्याचे काम टीटीओ करतात. जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठाने मात्र या कामासाठी १९६४ मध्ये यिस्सूम रिसर्च डेव्हलपमेंट कंपनी स्थापन केली.
३. यिस्सूमने आजवर ८० स्टार्ट-अप कंपन्यांची स्थापना केली आहे. यिस्सूमने बाजारात आणलेली उत्पादने दरवर्षी अब्जावधी डॉलर्सला विकली जातात. इस्राएलचा व्यावसायिक दृष्टिकोन यातून स्पष्ट होतो. त्याची फळेही त्यांना मिळत आहेत.
४. इस्राएल आज संशोधन आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या बाबतीत जगात अग्रेसर आहे.
५. इस्राएलची ५० टक्के औद्योगिक निर्यात स्टार्ट-अप कंपन्या करतात, तर देशाच्या जीडीपीमध्ये त्यांचा वाटा तब्बल १५ टक्के एवढा आहे.

(अकोला आवृत्तीचे संपादक रवि टाले यांनी तेल अवीव येथे झालेल्या ‘फ्यूल चॉइसेस आणि स्मार्ट मोबिलिटी समिट’मध्ये ‘लोकमत’चे प्रतिनिधित्व केले.)

Web Title: Start Up Nation ... on the occasion of 'Fuel Choice and Smart Mobility Summit' in Tel Aviv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.