- ओंकार करंबेळकर

थिमक्का. नानम्मल. मस्तानम्मा.
एरवीच्या आपल्या साध्यासरळ
धुवट लुगड्यासारख्या आयुष्यात
या तिघींनी एकेक असा
भन्नाट धागा विणलाय,
की ज्याचं नाव ते!

थिमक्का. वय वर्षं १०६.
- पोटी मूल नाही, तर वांझोटेपणाचा शिक्का नको म्हणून सत्तरेक वर्षांपूर्वी या बाईनं आपल्या गावाकडे जाणारा एक रस्ता निवडला, आणि त्याच्या दोन्ही कडांना वडाची झाडं लावायला घेतली. रोज किमान एक झाड लावायची. आणि कालपर्यंत लावलेली झाडं पोटचं मूल वाढवावं, तशा निगुतीनं वाढवत राहायची. असं गेली कित्येक वर्षं, रोज चाललंय.
वयाची शंभरी उलटली, तरी अजूनही रोज चाललंय.

**********

नानम्मल. वय वर्षं ९८.
या वयात आॅलिम्पिकमधल्या अ‍ॅथलिट्स असतात तशा चपळाईनं योगासनं करते ही आजीबाई. आयुष्यभर योगासनं केली आणि दुसºयांना शिकवली.
घरापलीकडचं जग पाहिलेलंच नाही.
गावाबाहेरचा एकच माणूस नानम्मलच्या चांगल्या ओळखीचा आहे -
नरेंद्र मोदी!

**********

जगभरातून पाच लाखांवर नातवंडांची आॅनलाइन फौज जमवणारी यू ट्यूबस्टार मस्तानम्मा. या आज्जींचं वय अवघं १०६.
शेतात चूल पेटवून भसाभस चिरत-कापत-कांडत-कुटत रांधायच्या हटके स्टाइलमुळं
५ लाखांहून जास्त फॉलोअर्स मिळवणाºया आजीबाई यू ट्यूबवरून सगळ्या जगभर प्रसिद्ध झाल्या आहेत. मिचमिच्या डोळ्यांतून, गालांमध्ये हसत शेतात स्वयंपाक करणाºया या खमक्या बाईनं एकटेपणाची थोडीथोडकी नाही तर तब्बल आठ दशकं काढली आहेत.
आणि गंमत म्हणजे यू ट्यूब म्हणजे काय याचा बार्इंना ठार पत्ता नाही!!!

- मुकेश माचकर
शिवाजीराव गायकवाड हे मराठी नाव टाकून कर्नाटकातून तामिळनाडूत गेलेल्या एका विलक्षण माणसाची ‘हिट’ आणि ‘फ्लॉप’च्या पलीकडे पोहचलेली अफलातून कहाणी
आज जो दिसतो, त्या रजनीकांतमध्ये एक अजब विरक्ती आहे... ती आशकमस्त टाइप बोलघेवडी फकिरी नाही...
ऐन तारुण्यात त्याने अफाट यश उपभोगलं आहे. यशाबरोबर आलेली सगळी सुखंही मन:पूत भोगून झाली आहेत. या सुखांच्या पलीकडे काहीतरी शाश्वत आहे, असलं पाहिजे, अशी आंतरिक जाणीव असलेल्या माणसाचा हा तृप्त, निर्लेप संन्यास आहे... तोही राजस!
देवांनाही हेवा वाटावा इतकी अफाट लोकप्रियता मिळाल्यानंतरही तो कमालीचा साधा आहे.
पडद्यापलीकडे तो जसा असतो तसा दिसतो. टक्कल झाकत नाही आणि पांढरे केसही लपवत नाही. सुपरस्टारपदाचे तामझाम मिरवत नाही, पार्ट्या करत नाही. रंगरोगन थापून, वय लपवून फिरत नाही. दक्षिणेचा हा महानायक उत्तरेत अगदी फाटक्या माणसासारखा हिमालयात तीर्थाटन करून येतो, तेव्हा तिथे त्याला कोणीही ओळखत नाही. सफेद लुंगी आणि शर्टातल्या कोणत्याही अण्णासारखाच तो दिसतो आणि तसाच राहतो-वावरतोही!
- असा माणूस राजकारणात, खासकरून आजच्या डिझायनर राजकारणात उतरेल का?
उतरला तर चालेल, टिकेल का?
राजकारणात तीव्र चिवट महत्त्वाकांक्षा लागते. ती रॉकेटच्या इंधनासारखं काम करते.
ते इंधन रजनीकांतमध्ये आहे का?
की बस कंडक्टर ते महानायक या भल्या मोठ्या झेपेमध्ये ते संपून गेलं?
तामीळ जनता गेली २२ वर्षं त्याच्या आगमनाच्या करेक्ट वेळेकडे डोळे लावून बसली आहे...
भारतातल्या घातक अस्मितावादी राजकारणात करेक्ट वेळ यायची वाट पाहायची नसते;
आपण जी वेळ साधू ती करेक्ट बनवून दाखवायची असते,
हे रजनीकांतला तेव्हाही कळलं नसावं, अजूनही कळलेलं दिसत नाही!
- नाहीतर लोखंड तापलेलं असताना हातोडा मारायला तो चुकला असता का?

- वन्दना अत्रे
बाबा अलाउद्दिन खान हे तिचे वडील.
ते म्हणाले, ‘तुझ्यावर मा शारदेचा आशीर्वाद आहे. हे सूरबहार हाती घे’
- आणि तिने एका व्रताचा निखाराच जणू हाती घेतला. पुढे जन्मगाठ पडली ती एका अवलिया कलावंताशी. पंडित रविशंकर. संसार सुरू झाला; पण फुलला नाही!
दोघांमध्ये कुणाची कला श्रेष्ठ, असा पेच उभा राहिल्यावर तिने कठोर पण केला,
गुरुजी आणि मा शारदा, या दोघांव्यतिरिक्त कुणासाठीही कधीही न वाजवण्याचा!
... आणि स्वत:ला दाराआड बंद केलं.
पैसा, प्रसिद्धी, नावलौकिक हे सारं झिडकारून ती एकटी जगत राहिली!
नम्र पण ठाम आणि निर्मम ‘नकार’ हेच जगणं!!!
दक्षिण मुंबईतल्या एका इमारतीत त्या आजही बंद दाराआड राहातात.
मध्यरात्र उलटताना सूरबहारच्या स्वरांनी दरवळणाºया बंद दाराच्या आड!
मोजके शिष्य वगळले, तर ते स्वर्गीय वादन गेल्या
पन्नासेक वर्षांत कुणीही- अक्षरश: कुणीही ऐकलेलं नाही!!!...

 

- शर्मिला फडके
...आता इतक्या वर्षांनंतर शोधायला गेलं तिच्या चित्रांतून,
पत्रांतून तरी हाती लागत नाही अमृता.
एक अमृता पूर्ण बेफिकीर, टोकाची वादग्रस्त मतं बाळगणारी,
बेधडक विधानं करणारी, प्रेमप्रकरणं, स्कॅण्डल्स यांना जन्म देणारी, स्वच्छंद, फुलपाखरी वृत्तीची.
दुसरी अमृता आत्ममग्न, संकोची, वैयक्तिक नातेसंबंधांच्या जाळ्यात गुरफटून गेलेली, आपल्याला कोणीच समजून घेत नाही असं मानणारी, सोलमेटच्या शोधात सैरभैर झालेली, आपल्या वडिलांचं आपल्याबद्दलचं मत चांगलं राहावं याकरता धडपडणारी.
तिसरी अमृता बेबंद लैंगिक संबंधांमधून निर्माण झालेलं अनारोग्य, गर्भपात यांनी ग्रासलेली, निराशावादी.
एकामागोमाग एक जोडीदारांकडून शारीरिक संग उपभोगल्यावरही मानसिक प्रेम न गवसलेली अनाघ्रात अमृता.
...या सगळ्यापल्याडची तिची चित्रं. आणि रंगांच्या, आकारांच्या सौंदर्याला स्पर्श करता यावा म्हणून आसुसलेली,
झगडत राहिलेली... तीच!


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

प्रमोटेड बातम्या

प्रमोटेड बातम्या

मंथन अधिक बातम्या

भाषाभ्यास...अनास्था का?

भाषाभ्यास...अनास्था का?

13 hours ago

मरणासन्न अजगराला नवजीवन 

मरणासन्न अजगराला नवजीवन 

6 days ago

अजब स्वप्नांची गजब दुनिया

अजब स्वप्नांची गजब दुनिया

6 days ago

भाषाही हिरवीगार

भाषाही हिरवीगार

6 days ago

भजे, इमरती आणि निवडणूक

भजे, इमरती आणि निवडणूक

6 days ago

शिक्षकांचा कणा अजूनही ताठ आहे!

शिक्षकांचा कणा अजूनही ताठ आहे!

6 days ago