प्रवास अमृताचा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2018 08:30 AM2018-05-06T08:30:38+5:302018-05-06T08:30:38+5:30

पॅरिसमधून भारतात परतणे हा अमृताचा स्वत:च्या मुळांपर्यंत पोहचण्याचा, स्वशोधाचा प्रवास होता. यानंतरच्या प्रवासात अल्पावधीतच तिनं कॅनव्हासवर मोठमोठे मुक्काम ओलांडले, दीर्घ पल्ल्याचा मार्ग ती चालून गेली.

Journey of Amrita Shergil painting journey | प्रवास अमृताचा

प्रवास अमृताचा

googlenewsNext

- शर्मिला फडके

चित्रकाराचा प्रवास स्वत:ला, स्वत:तल्या कलेच्या बीजांना शोधण्याकरता असतो, तसाच तो स्वत:च्या मुळांना शोधण्याकरताही असू शकतो. अमृता शेरगिलचा प्रवास तसा होता. भारतीय-शीख धर्मीय वडील आणि हंगेरियन आईच्या पोटी हंगेरीतील बुडापेस्ट इथे जन्मलेल्या अमृताला घेऊन शेरगिल कुटुंब भारतात शिमल्याच्या त्यांच्या वडिलोपार्जित घरात परत आले तेव्हा अमृता ८ वर्षांची होती. हिमालयाच्या पायथ्याशी असलेलं देखणं शिमला. उच्चभ्रू भारतीय आणि ब्रिटिश लोकांचे तिथे वास्तव्य होते. उमराव सिंग शेरगिल, अमृताचे वडीलही प्रतिष्ठित घराण्यातले नामवंत विद्वान. छायाचित्रकलेत त्यांचं नाव होतं. त्यांनी काढलेल्या त्यावेळच्या छायाचित्रांमध्ये दिसतात सळसळीत, रेशमी पोषाखातल्या स्त्रिया, पाश्चात्य पेहेरावातले रुबाबदार पुरुष, श्रीमंती फर्निचर, पियानो वाजवणाऱ्या मुली, सुबक बगिचे, सजवलेल्या ख्रिसमस ट्रीच्या शेजारी उभ्या असलेल्या अमृता आणि इंदिरा या बहिणी, शुभ्र लेसच्या फ्रॉक्समध्ये..
त्यानंतर वयाच्या १७व्या वर्षी अमृता पॅरिसला एकोल द बोझान या प्रतिष्ठित कला-संस्थेमध्ये चित्रकला शिकायला गेली. या संपूर्ण कालावधीत अमृताने खºया अर्थाने भारत कधी पाहिलाही नव्हता. बंदिस्त संगमरवरी कोशातले तिचे आयुष्य. स्थानिक भारतीय लोकजीवनाशी दुरान्वयानेही कधी संबंध आला नाही.
मात्र पॅरिसला यूरोपियन कलाशिक्षकांकडून चित्रकलेचे धडे घेत असताना अचानक अमृताला अनाकलनीय ओढ लागली ती आपल्या पितृदेशाची.
अमृताच्या मनात भारतात परतण्याची तीव्र इच्छा मूळ धरत होती यामागचं कारण कदाचित तिच्यातली रंगांची ओढ होती. गोगँच्या चित्रशैलीचं आकर्षणही तिला याच काळात जडलं होतं आणि बहुधा त्याच्या स्वैर, भटक्या मनोवृत्तीचंही. भारतात परतावं, तिथे मनसोक्त भटकावं आणि रंगवावंसं तिला वाटत होतं. पॅरिसच्या स्टुडिओतील निस्तेज, धूसर वातावरणापेक्षा भारतातील प्रकाशमान वातावरण आपल्या चित्रनिर्मितीला अधिक अनुकूल आहे, तिथे आपण यशस्वी होऊ हा आत्मविश्वास तिला होता. आईवडिलांच्या मर्जीविरु द्ध १९३४ साली भारतातील अमृतसरजवळच्या आपल्या वडिलोपार्जित गावी अमृता परतली. तेव्हा तिचे वय होते २१ वर्षे.
‘भारतात परतल्यावर मला खऱ्या अर्थाने जाणीव झाली की माझा जन्म चित्र रंगवण्याकरताच झालेला आहे.’ पॅरिसला कलाशिक्षण घेतलेल्या अमृताचे हे उद्गार तिच्या मनातल्या भारतीय भूभागाच्या तीव्र आकर्षणाचेच द्योतक आहेत. भारतात परतणे हा अमृताचा स्वत:च्या मुळांपर्यंत पोहचण्याचा, स्वत:ला शोधण्याचा प्रवास होता.
तिला माहीत नव्हतं, कुणालाही माहीत नव्हतं तिच्याजवळ फक्त पुढची सात वर्षच आहेत या शोधाकरता. तिचा हा शोध नेमका किती पूर्ण झाला माहीत नाही; पण या इतक्या कमी कालावधीमध्ये तिने तिच्या कॅनव्हासवर मात्र अनेक मोठमोठे मुक्काम ओलांडले, दीर्घ पल्ल्याचा मार्ग ती चालून गेली.
भारताच्या दक्षिण प्रांतातल्या समुद्रात तिची पावलं भिजली. गडद कांतीच्या, डौलदार नववधू, कर्मठ ब्राह्मण बटू तिच्या कॅनव्हासवर विराजमान झाले. सरायातल्या पडद्याआडच्या, घुंगट घेतलेल्या, श्रमजिवी, सुंदर स्त्रिया, श्रावणगीते गाणाºया मुली तिच्या पेंटिंग्जमध्ये आल्या.
तिच्या चित्रांमधल्या रंगछटा प्रखर, झळाळत्या होत गेल्या, काळ्या, रापलेल्या त्वचांची माणसं तिच्या कॅनव्हासवर दिसायला लागली.
अमृता भारतात परतली ते दिवस कडाक्याच्या थंडीचे होते. उत्तर प्रदेशातली ही थंडी. अमृताला भारतातल्या ज्या लख्ख तळपत्या उन्हाचे, सोनेरी सूर्यप्रकाशात झळाळणाºया रंगांचे आकर्षण पॅरिसमध्ये असताना वाटत होते, ते वातावरण आसपास कुठेच नव्हते. अमृता काहीशी निराश झाली. पण मग तिने आसपासचा पहाडी इलाका कधी घोड्यावरून, कधी पायी असा धुंडाळण्याचा, निरूद्देश भटकंती करण्याचा परिपाठ चालू केला. आणि मग हळूहळू तिला गोठलेल्या आसमंतातले, संथ, धुकाळ वातावरणातले सौंदर्य जाणवायला लागले.
वयाच्या जेमतेम २२ व्या वर्षी अमृताने केलेला दक्षिण भारताचा, ग्रामीण भागांमधला आणि मंदिरे, लेणी पहाण्याकरता केलेला सलग तीन महिन्यांचा प्रवास तिच्या विजेच्या लोळासारख्या अल्पजीवी आणि झळाळत्या आयुष्यातला, कारकिर्दीतला एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
अजिंठा वेरूळपासून त्रिवेंद्रम, मदुराई, महाबलीपुरम, मद्रास, हैदराबाद अशी ती संपूर्ण दक्षिण भारतात फिरली. प्रवासात तिची नजर खुली, कलासक्त होती, भारतीय प्राचीन कला, मंदिरे, लेणी, शिल्पांच्या सौंदर्याचा तिने भरभरून आस्वाद घेतला, माणसांचे अनुभव घेतले, व्यावसायिक यश-अपयश पचवले. प्रवासाला निघालेली अमृता तरु ण वयाची, अपरिपक्व स्वभावाची; पण तिची कलाविषयक जाण पक्की होती, चांगल्या वाईटातला भेद निदान कलेच्या बाबतीत तिला स्पष्टपणे उमगत होता. अमृताने आपल्या या प्रवासात अक्षरश: शेकडो पत्रे लिहिली, आपल्या आईवडिलांना, बहिणींना, मित्र-मैत्रिणींना, प्रियकराला, कार्ल खंडालवालासारख्या कला समीक्षक स्नेह्याला लिहिलेली तिची पत्रे हा तिच्या कला-प्रवासाच्या नोंदींचा सुंदर दस्तावेज आहे. अमृताचे या प्रवासादरम्यान हळूहळू पण ठामपणे परिपक्वतेतं होत गेलेलं परिवर्तन, तिच्याजवळ जमत गेलेली अनमोल अनुभवांची शिदोरी, भारतीय कलेबद्दलची वाढलेली उमज, दूर झालेले गैरसमज आणि सगळ्यात महत्त्वाचे तिच्या चित्रकलेत घडून आलेले आमूलाग्र परिवर्तन या सगळ्याची दखल तिच्या प्रवासी पत्रांमधून अत्यंत स्पष्टतेने आपल्याला होते.
अमृता शेरगिलमधला चित्रकार या प्रवासात अक्षरश: घडत गेला. ‘आजवर मी काढत होते ती चित्रं आणि यानंतर मी काढीन ती चित्रं यातला फरक केवळ तुमच्यासारख्या कसबी कलासमीक्षकालाच उमजू शकेल,’ अमृता कार्ल खंडालवालांना एका पत्रात लिहिते. भारतातले नैसर्गिक सौंदर्य, इथल्या लोकांच्या चेहºयावरचे भाव, हालचालींमधला डौल, त्यांची साधी, मातीशी जोडलेली जीवनशैली हे सगळं आजवर कोणाही भारतीय चित्रकाराला कधीच का चितारावंसं वाटलं नाही याचं तिला नवल वाटलं. हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांची सुंदर; पण कृत्रिम शैलीत रंगवलेली असंख्य निसर्गचित्रं जगभर प्रसिद्ध आहेत; पण इथल्या पायवाटांवर थकून बसलेल्या श्रमजीवींचे, उन्हात काळवंडलेले चेहरे त्यांना का रंगवावेसे वाटले नाहीत कधीच? अमृता विचारते.
भारतीय भूभागावरील लोकजीवनाने, सौंदर्याने, रंगांनी अमृता झपाटून गेली होती. तहानेने व्याकूळ झालेल्या जिवासारखे तिने ते शोषून घेतले.
एका पत्रात ती लिहिते - ‘मी माझ्या कलेच्या साहाय्याने, रेषा, रंग, आकाराच्या माध्यमातून इथल्या लोकांच्या आयुष्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहे, विशेषत: गरीब आणि दु:खी लोकांच्या. पण मला या समस्या केवळ चित्रांच्या रचनेतूनच मांडाव्याशा वाटतात, त्याही अमूर्तपणे. मला चित्रांमधून स्वस्त भावनिक आव्हान करण्याचा तिटकारा आहे. त्यामुळे मी कोणताही प्रचारी संदेश चित्रांमधून देऊ शकत नाही.’
तीन महिने दक्षिण भारतात केलेल्या प्रवासामध्ये खेड्यांमध्ये पाहिलेल्या भारतीय लोकजीवनात अमृताला आपल्या चित्रकलेची नस सापडली. या प्रवासातल्या क्षणचित्रांवर आधारित तिची एकाहून एक सुंदर चित्रे नंतरच्या काळात जगप्रसिद्ध झाली.
अमृता सर्वात जास्त रमली, पूर्णपणे नतमस्तक झाली अजिंठा आणि वेरूळच्या शिल्पसौंदर्यामुळे. भारतीय खरी कला किती उच्च दर्जाची आहे हे मला इथे कळले. इतकी सुंदर जागा, निरव शांतता, मनमोहक संध्याप्रकाश, खडकांतून झरणारे स्फटिकजल आणि सगळीकडे देखणी, डौलदार शिल्प.. मी केवळ थक्क झाले आहे, भारावून गेले आहे या वातावरणात. यापुढे मला काहीही बघावेसे वाटत नाही. माझे मन तृप्त झाले आहे. अमृता अतीव आनंदाने आपल्या बहिणीला लिहिलेल्या पत्रात सांगते.
वेरूळ अजिंठ्याच्या चित्रात भारतीय कलेचा मूळ गाभा आहे असं ती तिचा मित्र कार्ल खंडालवालांना लिहिते. अमृताचा प्रवास यानंतर लवकरच संपला. तिचा जीवनप्रवासही फार काळ लांबला नाही दुर्दैवाने. मात्र या दरम्यानच्या काळात अमृता शेरगिल खºया अर्थाने एक आधुनिक भारतीय चित्रकार म्हणून नावारूपाला आली, जगप्रसिद्ध झाली. त्याचे बरेचसे श्रेय निश्चित या चित्रप्रवासाला जाते.
(लेखिका ख्यातनाम कला समीक्षक आहेत.)

Web Title: Journey of Amrita Shergil painting journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.